नवी दिल्ली : अलीकडे आशियाई विकास बँक आणि फिचने चालू आर्थिक वर्षांसाठी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसंबंधी पूर्वानुमानात लक्षणीय कपात करून ते सात टक्क्यांपर्यंत खाली आणणारे सुधारित अंदाज जाहीर केले असले, तरी जागतिक प्रतिष्ठेच्या ‘एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज’ने सोमवारी विकासदराचा ७.३ टक्क्यांचा आधी व्यक्त केलेला अंदाज कायम ठेवत असल्याचे जाहीर केले. विद्यमान २०२२ च्या अखेपर्यंत महागाई दर सहा टक्क्यांच्या उच्च अशा तापदायक पातळीवर राहण्याची शक्यता या पतमानांकन संस्थेने वर्तविली आहे.

मागील वर्षी (२०२१-२२) सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीमध्ये ८.७ टक्के वाढ साधणारी, भारतीय अर्थव्यवस्थेचा एप्रिल-जून २०२२ तिमाहीत १३.५ टक्के दराने विस्तार झाला आहे. चालू आर्थिक वर्षांसाठी आजवर अर्थविश्लेषक व प्रतिष्ठित अर्थसंस्थांकडून व्यक्त केल्या गेलेल्या अंदाजात, ‘एस अँड पी’चाच ७.३ टक्क्यांचा अंदाज हा सर्वाधिक आहे. किंबहुना तो रिझव्‍‌र्ह बँकेच्या ७.२ टक्क्यांच्या अनुमानापेक्षा जास्त आहे व सप्ताहअखेर नियोजित द्विमासिक आढाव्याच्या बैठकीअंती रिझव्‍‌र्ह बँकेकडूनही विकासदराचा अंदाज कमी केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विकासदरासंबंधी वेगवेगळे कयास..

एस अँड पी रेटिंग्ज      –      ७.३ टक्के

रिझव्‍‌र्ह बँक     –       ७.२ टक्के

आशियाई विकास बँक    –      ७ टक्के

फिच रेटिंग्ज     –      ७ टक्के

इंडिया रेटिंग्ज    –      ६.९ टक्के

स्टेट बँक       –      ६.८ टक्के

सिटीग्रुप        –      ६.७ टक्के