scorecardresearch

‘एअर इंडिया’ची विक्री अंतिम टप्प्यात; यशस्वी बोलीदाराचा निर्णय आज

यशस्वी बोलीदाराचा निर्णय आज

air-india-1200
संग्रहीत छायाचित्र

यशस्वी बोलीदाराचा निर्णय आज

नवी दिल्ली : तोटय़ात असलेली सार्वजनिक क्षेत्रातील हवाई सेवा अर्थात एअर इंडियाची मालकी कुणाकडे जाईल याचा निर्णय बुधवारी (२९ सप्टेंबरला) लागण्याची शक्यता आहे. सरकारमधील वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने यशस्वी बोलीदाराचा निर्णय लागून, १५ ऑक्टोबपर्यंत ही दीर्घकाळ रखडलेली निर्गुंतवणुकीची प्रक्रिया मार्गी लागणे अपेक्षित आहे.

एअर इंडियावरील मालकीसाठी वेगवेगळ्या चार निविदा आल्या असल्या तरी टाटा समूहाची बोली ही अग्रेसर मानली जात आहे. टाटा सन्सबरोबरीनेच, स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे स्पर्धेत आहेत. आरबीएसए अ‍ॅडव्हायजर्स आणि ईवाय अशा याकामी सरकारकडून नियुक्त सल्लागार संस्था एअर इंडियाच्या मूल्यांकनाविषयी सादरीकरण करतील आणि बुधवारी सायंकाळी ५ वाजता यशस्वी बोलीसंबंधी निर्णय येणे अपेक्षित आहे.

एअर इंडियासाठी निर्धारित करण्यात राखीव किमतीबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नसला तरी त्यापेक्षा जास्त किमतीवर लावली जाणारी बोली यशस्वी ठरेल. सल्लागार संस्थांकडून यशस्वी बोलीविषयी प्राथमिक चाचपणी पूर्ण झाल्यावर, त्यांच्याकडून येणारी शिफारस ही अंतिम मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठविली जाईल.

एअर इंडियासाठी लावल्या जाणाऱ्या आर्थिक बोलीत ८५ टक्के हिस्सा हा कंपनीवरील कर्जदायित्वासाठी, तर १५ टक्के हा रोख रूपात सरकारी तिजोरीत येण्याचे अंदाजण्यात येत आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालयातील निर्गुतवणूक विभाग अर्थात ‘दिपम’चे सचिव तुहिन कांता पांडे यांनी ‘एअर इंडियाची निर्गुतवणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात प्रवेश केला आहे’, असे ट्वीट करून अलीकडेच स्पष्ट केले आहे. बराच काळ खोळंबलेले हे खासगीकरण प्रक्रियेचा पाठपुरावा गतिमान करण्यासाठी केंद्राने अलीकडच्या काळात अनेकांगी पावले टाकली असून, संभाव्य गुंतवणूकदारांना बोली लावणे आकर्षक ठरेल अशा अनेक कलमांचा समावेश केला गेल्याचाच हा परिणाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-09-2021 at 04:15 IST