पीटीआय, नवी दिल्ली
करोनानंतर उद्योग-व्यसासाय पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने वाणिज्य वाहनांच्या विक्रीत निरंतर वाढ सुरू आहे. मार्च महिन्यात वाणिज्य वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत १४.९१ टक्क्यांनी वाढत ७७,९३८ वाहनांवर पोहोचली. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ६७,८२८ वाणिज्य वाहनांची विक्री झाली होती.
सेमी कंडक्टर चिपच्या अपुऱ्या पुरवठय़ामुळे वाहन उद्योगाशी निगडित पुरवठा साखळीला खीळ बसली असून त्यापरिणामी वाहनांच्या विक्रीत निरंतर घसरण सुरूच आहे. सरलेल्या मार्च महिन्यात प्रवासी वाहनांच्या एकूण विक्रीत ४.८७ टक्क्यांची घट होत ती २.७१ लाख वाहनांवर मर्यादित राहिली.
मार्चमध्ये सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनांच्या एकूण विक्रीत गेल्या वर्षांशी तुलना करता घट झाली आहे. सरलेल्या महिन्यात २,७१,६२६ वाहनांची विक्री करण्यात आली, तर गेल्या वर्षी याच महिन्यात (मार्च २०२१) २,८५,२४० प्रवासी वाहनांची विक्री झाली होती, अशी माहिती वाहन वितरकांची नेतृत्वदायी संघटना ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन’ने (फाडा) मंगळवारी दिली.
प्रवासी वाहनांची मोठय़ा प्रमाणावर मागणी कायम असून ग्राहकांना त्यांच्या आवडत्या वाहनासाठी प्रतीक्षा करावी लागते आहे. मात्र जागतिक पातळीवरील सेमी कंडक्टर चिपच्या पुरवठय़ाबाबत अजूनही समस्या कायम असल्या तरी गेल्या महिन्याच्या (फेब्रुवारी २०२१) तुलनेत त्यात सुधारणा झाली आहे. याचबरोबर रशिया-युक्रेन युद्ध आणि चीनमधील टाळेबंदीमुळे सेमी कंडक्टरचा पुरवठा पुन्हा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे आणि त्याचा वाहन वितरणास फटका बसण्याची शक्यता आहे, असे फाडाचे अध्यक्ष िवकेश गुलाटी यांनी नमूद केले.