इन्फोसिसचे सलील पारेख यांना ८८ टक्के वेतनवाढ

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस टेक्नॉलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांचे वार्षिक वेतन तब्बल ८८ टक्क्यांनी वाढून ७९.७५ कोटी रुपयांवर गेले आहे.

मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस टेक्नॉलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांचे वार्षिक वेतन तब्बल ८८ टक्क्यांनी वाढून ७९.७५ कोटी रुपयांवर गेले आहे. यातून ते देशातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक वेतनमान असणारे प्रमुख बनतील. पारेख यांना सध्या ४२.५० कोटी रुपये वार्षिक वेतन मिळत असून, सुधारित वेतन हे २ जुलै २०२२ पासून, भागधारकांकडून मंजुरीची मोहोर उमटल्यावर लागू होईल, अशी माहिती इन्फोसिसच्या आर्थिक वर्ष २०२२च्या वार्षिक अहवालाने दिली आहे.

मुख्याधिकारीपदावर २०१८ पासून कार्यरत सलील पारेख यांची १ जुलै २०२२ ते ३१ जुलै २०२७ अशा आणखी चार वर्षांचा कार्यकाळाला कंपनीने मंजुरी दिली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा ३० वर्षांहून अधिक अनुभव असलेले पारेख या आधी कॅपजेमिनीमध्ये कार्यकारी मंडळाचे सदस्य होते. इन्फोसिसचे याआधीचे मुख्याधिकारी विशाल सिक्का यांची २०१७ आर्थिक वर्षांत ७४ कोटी रुपये वार्षिक वेतनासह नियुक्ती करण्यात आली होती. त्या वेळी या भरमसाट वेतनमानावरून मोठा वाद झाला होता. यामुळे पारेख यांची नियुक्ती करताना इन्फोसिसने कमी वेतन निर्धारित केले होते.

नीलेकणी यांच्याकडून स्वेच्छेने वेतन त्याग

इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि अकार्यकारी अध्यक्ष नंदन नीलेकणी यांनी स्वेच्छेने वेतन त्याग करत कंपनीला दिलेल्या त्यांच्या सेवांसाठी कोणतेही मानधन न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Salil parekh infosys hike infosys field information technology chief executive officer ysh

Next Story
तृतीय पक्ष वाहन विमा १ जूनपासून महागणार!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी