पेटंट कायद्यावरून काही टॅबलेट्स व स्मार्टफोन उत्पादनांबाबत ‘अॅपल’ कंपनीविरोधात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत दक्षिण कोरियाच्या ‘सॅमसंग’ कंपनीची सरशी झाली आहे. त्यानुसार ‘अॅपल’च्या काही उत्पादनांना अमेरिकेच्या औद्योगिक लवादाने बंदी घातली आहे. अर्थात ही उत्पादने या घडीला अमेरिकन बाजारपेठेत कालबाह्य़ ठरल्याने या निकालाचा आर्थिक फटका ‘अॅपल’ला बसणार नाही.
अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार आयोगाच्या निमन्यायिक लवादासमोर ऑगस्ट २०११ मध्ये ‘सॅमसंग’ने ‘अॅपल’विरोधात हा खटला भरला होता. आपल्या संशोधनाची व उत्पादनांच्या तंत्राची ‘अॅपल’ने उचलेगिरी केल्याचा ‘सॅमसंग’चा आरोप होता. तो या लवादाने मान्य केला आहे.
ज्या उत्पादनांना या निर्णयाने अमेरिकेत बंदी घातली जाणार आहे ती उत्पादने या घडीला कालबाह्य़ झाली असून त्यापुढील अद्ययावत उत्पादनांची सध्या चलती आहे. त्यामुळे या निकालाने ‘सॅमसंग’चा विजय हा प्रतीकात्मक ठरला आहे. बंदी घातलेल्या या उत्पादनांमध्ये एटी अँड टी आयफोन फोर, आयफोन थ्री आणि थ्री जीएस तसेच आयपॅड थ्रीजी आणि आयपॅड २, ३जी यांचा समावेश आहे.
अर्थात लवादाच्या या निर्णयास न्यायालयात आव्हान देण्याचा पर्याय मात्र ‘अॅपल’कडे आहे. तसेच त्याउपर अध्यक्षीय आदेशानुसार तो निर्णय रद्दही होऊ शकतो.
‘सॅमसंग’ने या निकालाचे स्वागत केले आहे. आमच्या दशकभराच्या संशोधनाची उचलेगिरी ‘अॅपल’ने केली यावर या निर्णयाने शिक्कामोर्तब केले आहे. आम्ही संशोधनाची आणि अद्ययावत उत्पादने लोकांच्या सेवेत आणण्याची परंपरा यापुढेही कायमच ठेवू, अशी ग्वाहीही कंपनीने निवेदनाद्वारे दिली आहे. ‘अॅपल’कडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.