मुख्य बँकेत विलीनीकरणाच्या स्टेट बँकेच्या प्रस्तावाला विरोध म्हणून पाच सहयोगी बँकांमध्ये शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या लाक्षणिक संपात या पाचही बँकांच्या ५,७०० शाखांमधील ५० हजारांहून अधिक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सहभाग केला.
‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन’ (एआयबीईए) तसेच ‘स्टेट सेक्टर बँक एम्प्लॉईज असोसिएशन’ यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी मुंबईतील आझाद मैदान येथे निदर्शने करण्यात आली. संपामुळे पाचही बँकांच्या शाखा बंद होत्या. परिणामी या बँकांमध्ये व्यवहार होऊ शकले नाही. सहयोगी असल्या तरी स्टेट बँकेच्या या पाचही बँका त्यांच्या विभागीय क्षेत्रात मोठय़ा आहेत, असे नमूद करत संघटनेच्या नेत्यांनी विलीनीकरण हे सार्वजनिक बँकांच्या राष्ट्रीयीकरण धोरणाविरुद्ध असल्याचे म्हटले आहे. तेव्हा स्टेट बँकेच्या अशा प्रस्तावाला सरकारने मंजुरी देऊ नये, अशी मागणीही आंदोलन संघटनेने केली आहे.
सहयोगी बँकांमध्ये यापुढे ७ जून, २८ व २९ जुलै रोजीदेखील संप पुकारला जाईल, अशी घोषणा संघटनेने आंदोलनानंतर केली. तर या विलीनीकरण विरोधात २९ जुलै रोजी देशातील सर्व बँकांमध्ये एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला जाईल, अशी माहितीही देण्यात आली.