वृत्तसंस्था, नवी दिल्ली

बँकिंग क्षेत्रातील अग्रणी स्टेट बँकेने मोठय़ा ठेवींवरील व्याजदराची फेररचना करताना, दोन कोटी आणि त्याहून अधिक रकमेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात ०.४० ते ०.९० टक्क्यांची वाढ केली आहे. नवीन दर मंगळवार, १० मेपासून लागू करण्यात आले आहेत.

स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ५ ते १० वर्षे आणि ३ ते ५ वर्षे मुदतीच्या दोन कोटी आणि त्याहून अधिक रकमेच्या मुदत ठेवींवर आता ४.५० टक्के दराने व्याज मिळणार आहे. ज्यावर आधी ३.६० टक्के दराने व्याज दिले जात होते. आता त्यात थेट ०.९० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तसेच २ ते ३ वर्षे मुदतीच्या मोठय़ा ठेवींवर आता ३.६० टक्क्यांऐवजी ४.२५ टक्के दराने व्याज मिळेल आणि १ ते २ वर्ष कालावधीच्या ठेवींवर ४ टक्के दराने व्याज मिळणार आहे. तसेच ४६-१७९ दिवसांच्या कालावधीसाठी आणि १८०-२१० दिवसांच्या कालावधीच्या मोठय़ा रकमेच्या ठेवींवर ३.५० टक्के तर २११ दिवस ते एक वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींसाठी ३.७५ टक्के व्याजदर असेल. व्याजाचे सुधारित दर नवीन मुदत ठेवी आणि मुदतपूर्ती झालेल्या ठेवींच्या नूतनीकरणासाठी लागू असतील, असे स्टेट बँकेने स्प्ष्ट केले आहे. चालू महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीने वाढत्या महागाई आवर घालण्यासाठी रेपो दरात ४० आधार बिंदूच्या वाढीची घोषणा केल्यांनतर बँकांकडून आता ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यात येत आहे.  रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर वाढीच्या निर्णयानंतर बंधन बँक, कोटक मिहद्र बँक, बँक ऑफ बडोदा, आयसीआयआय बँक आणि पंजाब नॅशनल बँकेसह अनेक बँकांनी ठेवींवर व्याजदर वाढवले आहेत.