देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेने गृहकर्ज वितरणाचा पाच लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

बँकेचा स्थावर मालमत्ता व गृहकर्ज व्यवसाय गेल्या दशकभरात पाच पटीने वाढला आहे. बँकेचे गृहकर्ज वितरण २०११ मध्ये ८९,००० कोटी रुपये होते.

अद्ययावत तसेच जलद तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कर्जदारांना व्यक्तिगत अर्थसाहाय्य सेवा देण्यावर बँकेने भर दिल्याचा हा परिणाम असल्याचे स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी सांगितले. संपूर्ण तंत्रस्नेही यंत्रणेद्वारे ग्राहकांसाठी घरपोच गृहकर्ज वितरण सुविधा अधिक बळकट करण्याचा मानस यानिमित्ताने खारा यांनी व्यक्त केला. याद्वारे बँकेने २०२४ पर्यंत सात लाख कोटी रुपयांचे गृहकर्ज वितरणाचे लक्ष्य राखले असल्याचेही ते म्हणाले.

गृहकर्ज वितरणात स्टेट बँकेचा सर्वाधिक ३४ टक्के हिस्सा आहे. बँकेने २००४ मध्ये या क्षेत्रात शिरकाव केला. पहिल्या वर्षांत बँकेने १७,००० कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले.