मुंबई : देशातील सर्वात मोठय़ा आणि डेरिव्हेटिव्हजच्या व्यवहारांसाठी तूर्त जगातील सर्वात मोठय़ा असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचे अर्थात एनएसई लिमिटेडचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर आशिषकुमार चौहान यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. ‘एनएसई’चे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ शनिवारी संपुष्टात आल्यानंतर, रिक्त झालेल्या जागेवर या नव्या नियुक्तीला बाजार नियामक ‘सेबी’ने ताबडतोब मंजुरी दिली आहे. औपचारिक घोषणा आज होण्याची शक्यता आहे.

    सर्वात जुना भांडवली बाजार असलेल्या बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आशिषकुमार चौहान सध्या कार्यरत असून, आता ते आजवर स्पर्धक राहिलेल्या शेअर बाजाराचे अर्थात एनएसईच्या सर्वोच्च पदाची सूत्रे हाती घेत आहेत.  एनएसईमधील चौहान यांच्या कार्यकाळाची ही दुसरी खेप असणार आहे. यापूर्वी त्यांनी नव्वदीच्या दशकात एनएसईच्या स्थापनेत हातभार लावणारी भूमिका बजावली आहे. एनएसईवर नव्या जबाबदारीसह त्यांचे पुनरागमन कधीपासून होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, त्यांनी पदभार स्वीकारेपर्यंत कंपनीचे कामकाज चालवण्यासाठी एनएसईच्या प्रशासकीय मंडळाने अंतर्गत कार्यकारी समितीची स्थापना केली आहे. दुसरीकडे ‘बीएसइ’नेही नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी पदासाठी पात्र उमेदवाराचा शोध सुरू केला आहे.