भांडवली बाजाराला ‘टी+१’ संक्रमणाचे वेध ; २५ फेब्रुवारीपासून गतिमान हिशेबपूर्ती प्रणालीचा अवलंब

सध्या भांडवली बाजारात दोन कामकाज दिवसांचा हिशेबपूर्ती कालावधी लागू आहे.

मुंबई : भांडवली बाजाराने ‘टी+१’ व्यवहार प्रणालीकडे संक्रमणाचा म्हणजेच व्यवहार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी हिशेबपूर्तीच्या (सेटलमेंट) गतिमान पर्यायाच्या अंमलबजावणीसाठी एक योजना तयार केली आहे. पुढील वर्षी २५ फेब्रुवारीपासून ही यंत्रणा टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होईल. सध्या भांडवली बाजारात दोन कामकाज दिवसांचा हिशेबपूर्ती कालावधी लागू आहे.

भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने समभाग खरेदी-विक्री व्यवहार झाला तो दिवस अधिक एका (टी+१) दिवसात विकलेल्या समभागांची रोख रक्कम बँक खात्यात अथवा खरेदी केलेले समभाग डिमॅट खात्यात जमा होऊन हिशेबाच्या पूर्ततेच्या पद्धतीचा पर्याय मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराला (एनएसई) देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षांपासून म्हणजेच १ जानेवारी २०२२ पासून भांडवली बाजार त्यांनी निश्चित केलेल्या कोणत्याही समभागासाठी टी+१ पद्धती लागू करू शकतील. सध्या, समभाग खरेदी अथवा विक्रीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर भांडवली बाजारातील व्यवहार दोन कामकाजाच्या दिवसांत (टी+२) पूर्ण केले जातात.

प्रस्तावित टी+१ व्यवहार पद्धती पर्याय टप्प्याटप्प्याने अमलात आणण्यात येईल. सुरुवातीला २५ फेब्रुवारीपासून हा पर्याय फक्त बाजार भांडवलाच्या दृष्टीने तळाच्या १०० कंपन्यांना लागू होईल आणि मार्च २०२२ पासून तळातील ५०० कंपन्यांसाठी या व्यवहार पद्धतीचा पर्याय उपलब्ध असेल, असे बीएसई आणि एनएसई यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. भांडवली बाजार, क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि डिपॉझिटरीज यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. ज्या कंपन्यांच्या समभागांचा यात समावेश करण्यात येईल त्यांची यादी भांडवली बाजाराकडून संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे.

विरोध कुणाचा आणि कशासाठी?

प्रस्तावित टी+१ प्रणालीचे बहुतांश स्थानिक दलाल-व्यापाऱ्यांनी त्यांना कमी कालावधीत अधिक व्यवहार करता येऊ शकल्याने स्वागत केले आहे. म्युच्युअल फंडांना एक दिवस आधी विमोचन (रिडम्प्शन) प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे, परंतु विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार हे जगभरातील बाजारात वेगवेगळ्या काल क्षेत्रात (टाइम झोन) कार्यरत असल्याने, त्यांना ही हिशेबपूर्तीच्या प्रक्रियेत जलदतेशी जुळवून घेणे काहीसे गैरसोयीचे ठरेल. त्यामुळे त्यांचे अभिरक्षक (कस्टोडियन) आणि काहींचा नव्या प्रणालीच्या इतक्या त्वरेने अंमलबजावणी करण्याला विरोध आहे

टी+१ प्रणाली म्हणजे काय? भांडवली बाजारात सध्या टी+२ अर्थात दोन कामकाज दिवसांचा हिशेबपूर्ती कालावधी लागू आहे. म्हणजेच समभाग खरेदी केले तर दोन कामकाज दिवसांनंतर ते ‘डिमॅट’ खात्यात जमा केले जातात आणि समभाग विकले असतील तर दोन दिवसांनंतर रोख रक्कम खात्यात जमा होतात. प्रस्तावित टी+१ मुळे या सर्व प्रक्रियेतील एक दिवस कमी होणार आहे. सेबीने १ जानेवारी २०२२ पासून  बाजाराला हा व्यवहार पर्याय लागू करण्याची मुभा दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sebi introduces t1 settlement system in stock markets zws

Next Story
अँकरचा बिगर इलेक्ट्रीक स्विच व्यवसायावर भर
ताज्या बातम्या