मौल्यवान धातूतील गुंतवणूकदारांसाठी नवीन चंदेरी पर्याय

‘सिल्व्हर ईटीएफ’मधील गुंतवणूक सुलभतेसाठी ‘सेबी’ची मार्गदर्शक तत्त्वे

‘सिल्व्हर ईटीएफ’मधील गुंतवणूक सुलभतेसाठी ‘सेबी’ची मार्गदर्शक तत्त्वे

मुंबई : भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने गुंतवणूकदारांना ‘सिल्व्हर एक्सचेंज ट्रेडेड फंड’मधील (सिल्व्हर ईटीएफ) गुंतवणूक सोयीची आणि पारदर्शक असावी यासाठी बुधवारी मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा केली.

‘सिल्व्हर ईटीएफ’च्या गुंतवणुकीची उद्दिष्टे, मूल्यांकन आणि नक्त मालमत्ता मूल्य निर्धारणाबाबत (एनएव्ही) आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे ‘सेबी’ने निर्दिष्ट केली आहेत. सध्या, भारतात म्युच्युअल फंडांना फक्त सोन्यावर बेतलेली गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजेच ‘गोल्ड ईटीएफ’ सादर करण्याची परवानगी आहे. ‘सिल्व्हर ईटीएफ’ हीदेखील एक म्युच्युअल फंड योजना असून ज्यामध्ये गुंतवणूक प्रामुख्याने चांदी किंवा चांदीशी संबंधित साधनांमध्ये केली जाईल.

‘सेबी’कडून प्रसिद्ध नवीन आराखडय़ानुसार, ‘सिल्व्हर ईटीएफ’ला चांदी आणि चांदीशी संबंधित गुंतवणूक साधनांमध्ये निव्वळ मालमत्तेच्या किमान ९५ टक्के गुंतवणूक करावी लागेल. त्यामुळे यापुढे ‘एक्सचेंज ट्रेडेड कमोडिटी डेरिव्हेटिव्हज’मध्ये चांदीचा सहभाग असलेले ईटीएफ हे ‘सिल्व्हर ईटीएफ’ म्हणून ओळखले जातील.

म्युच्युअल फंडांना ‘सिल्व्हर ईटीएफ’ योजनेत गुंतवणूक करताना काही अटी-शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. चांदीशी संबंधित ‘एक्सचेंज ट्रेडेड कमोडिटी डेरिव्हेटिव्हज’मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, म्युच्युअल फंडांनी अशा गुंतवणुकीबाबत मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (एएमसी) आणि विश्वस्त मंडळाच्या मान्यतेसह एक लेखी धोरण तयार करणे आवश्यक आहे. शिवाय ‘एएमसी’ आणि ट्रस्टींद्वारे वर्षांतून किमान एकदा पुनरावलोकन होणे गरजेचे आहे

‘एएमसी’च्या संकेतस्थळावर ‘सिल्व्हर ईटीएफ’ची ‘एनएव्ही’ दररोज प्रसिद्ध करावी लागणार आहे. याचबरोबर ज्या बाजारात ‘सिल्व्हर ईटीएफ’चे युनिट्स सूचिबद्ध आहेत, त्यांनादेखील संकेतस्थळावर ‘एनएव्ही’ प्रसिद्ध करणे अनिवार्य आहे. ‘सिल्व्हर ईटीएफ’ सादर करणाऱ्या म्युच्युअल फंड घराण्यांना युनिट वाटप केल्यापासून प्रत्यक्ष चांदी आणि ‘सिल्व्हर ईटीएफ’मधील परताव्यातील फरक संकेतस्थळावर मासिक आधारावर एक वर्ष, तीन वर्षे, पाच वर्षे, १० वर्षांच्या कालावधीच्या तुलनेसह द्यावे लागतील.

सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, कमोडिटी बाजाराशी निगडित ‘गोल्ड ईटीएफ’, ‘सिल्व्हर ईटीएफ’ आणि त्यासंबंधित फंडाचे व्यवस्थापन करण्यासाठी वस्तू वायदे बाजारासह, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह बाजारासंबंधी कौशल्य आणि अनुभव असलेल्या पात्र व्यक्तीची फंड व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करावी लागेल.

गुंतवणूकदारांना फायदे काय?

*  गुंतवणुकीचे वैविध्य हे जोखीम संतुलनासाठी आवश्यक असून, त्या दिशेने  सोन्याच्या बरोबरीने चांदीतील गुंतवणुकीचा पर्याय खुला होईल.

* गुंतवणूक सोयीस्कर बनण्यासह, ती तरल आणि पारदर्शकही बनेल.

* ‘सिल्व्हर ईटीएफ’द्वारे चांदीमध्ये डिमॅट स्वरूपात युनिट्सच्या माध्यमातून गुंतवणूक करता येईल.

*  यातून प्रत्यक्ष चांदी खरेदी करून ती दीर्घकाळासाठी बाळगण्यात येणाऱ्या कटकटी आणि खर्च यापासून मोकळीक मिळेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sebi issues operating norms for silver exchange traded funds zws

ताज्या बातम्या