मुंबई : भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसई लिमिटेडच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांना प्रशासकीय त्रुटी आणि कारभारातील हयगयीच्या प्रकरणी ३.१२ कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले होते. तो अद्याप न भरला गेल्याने, अटक करण्याची आणि मालमत्ता जप्त करून दंडवसुली करण्याची मंगळवारी नोटीस ‘सेबी’कडून बजावण्यात आली.

सेबीने ११ फेब्रुवारी रोजी चित्रा रामकृष्ण या एनएसईच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर असताना आनंद सुब्रमणियन यांची मुख्य कामकाज अधिकारी आणि सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याच्या प्रकरणात कथित प्रशासकीय हयगय केल्याबद्दल ३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. रामकृष्ण तो दंड न भरल्याने, नोटीस जारी केल्याच्या १५ दिवसांच्या आत व्याजासहित ३.१२ कोटींचा दंड भरण्याची नोटीस त्यांच्यावर बजावण्यात आली आहे. एनएसईतील ‘सह-स्थान’ घोटाळय़ाप्रकरणी सीबीआयने ६ मार्च रोजी चित्रा रामकृष्ण यांना अटक केली होती. सध्या त्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहेत.

गेल्या महिन्यात एनएसईचे तत्कालीन मुख्य कामकाज अधिकारी आनंद सुब्रमणियन आणि एनएसईचे माजी प्रमुख रवी नारायण यांनादेखील सेबीने सारख्याच प्रकरणात दोषी ठरवत प्रत्येकी २ कोटींचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. तर तत्कालीन मुख्य नियामक अधिकारी आणि अनुपालन अधिकारी व्ही. आर. नरसिह्मण यांना सहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.