‘सहारा’च्या गुंतवणूकदारांचा शोध सुरूच; परतफेड खात्यात २३ हजार कोटी पडून!

‘सेबी’कडून आजवर अवघ्या १२९ कोटींचे परताव्यापोटी वाटप

‘सेबी’कडून आजवर अवघ्या १२९ कोटींचे परताव्यापोटी वाटप

नवी दिल्ली : नऊ वर्षे उलटून गेले तरी सर्वोच्च न्यायालयाने सोपविलेल्या जबाबदारीप्रमाणे भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ला सहारा समूहाकडून प्रवर्तित दोन कंपन्यांमधील गुंतवणूकदारांना अवघ्या १२९ कोटी रुपयांचीच परतफेड करता आली आहे. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे फेडण्याच्या उद्देशाने उघडल्या गेलेल्या बँक खात्यात जमा २३ हजार कोटी वापराविना पडून असून, गुंतवणूकदारांचा शोध अद्याप सुरूच आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०१२ मध्ये सहाराच्या दोन कंपन्यांद्वारे बेकायदेशीररीत्या गोळा केलेल्या रकमेची व्याजासह परतफेड करण्याचे आदेश दिले. अशा सुमारे तीन कोटी रोखेधारकांचा संपूर्ण पैसा परत केला जाईल, ही जबाबदारी ‘सेबी’वर सोपविण्यात आली. परंतु मागील नऊ वर्षांत रोखेधारकांकडून परतफेडीची मागणी करणारे दावे दाखल झाले नाहीत, तर ‘सेबी-सहारा परतफेड खात्या’तील शिलकीत व्याजापोटी १,४०० कोटी रुपयांची नव्याने भर गेल्या वर्षभरात पडली आहे. सरलेल्या २०२०-२१ मध्ये परतफेडीपोटी या खात्यातून अवघे १४ कोटी रुपये गेले, तर नऊ वर्षांदरम्यान गुंतवणूकदारांना दिल्या गेलेल्या रकमेचे एकूण प्रमाण १२९ कोटी रुपये इतकीच आहे, अशी माहिती ‘सेबी’च्या वार्षिक अहवालातील आकडेवारीतून पुढे आली आहे.

वार्षिक अहवालातील तपशिलानुसार, ‘सेबी’ला ३१ मार्च २०२१ पर्यंत परतफेडीची मागणी करणारे एकूण १९,६१६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी १६,९०९ प्रकरणात ‘सेबी’ने १२९ कोटी रुपयांची (ज्यामध्ये ६६.३५ कोटी रुपये मुद्दल आणि ६२.३४ कोटी रुपये त्यावरील व्याजाचा समावेश) परतफेड केली आहे. ४८३ अर्ज (२.३० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे) ‘सेबी’ने काही शंका व विसंगती दूर करण्यासाठी गुंतवणूकदारांकडे परत पाठविले आहेत. सहाराकडून सादर केल्या गेलेल्या यादीतील २,४८७ प्रकरणे ही गुंतवणूकदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने आणि नोंदी न सापडल्यामुळे बंद करण्यात आल्याचे ‘सेबी’ने स्पष्ट केले आहे.

पुढे असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, विविध मालमत्तांच्या जप्तीच्या अनुषंगाने सहाराच्या कंपन्यांकडून, ३१ मार्च २०२१ पर्यंत एकूण १५,४७३ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. विशेष उद्देशाने स्थापित ‘सहारा-सेबी’ बँक खात्यात जमा या रकमेवर व्याज जमा होत जात ती रक्कम ३१ मार्च २०२१ अखेर २३,१९१ कोटी रुपये झाली आहे. सहारा समूहाने यावर प्रतिक्रिया देताना, ‘सहारा-सेबी’ बँक खात्यातील रक्कम व्याजासह किमान २५,००० कोटी रुपये असायला हवी ूम्हटले आहे.सहाराचे हे २५ हजार कोटी रुपये अनुचितपणे राखून ठेवले आहेत, असाही त्यांचा आरोप आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sebi refund to sahara investors inches up to rs 129 crore zws

Next Story
ओंकार स्पेशिअ‍ॅलिटीचा चिपळूणमध्ये नवा प्रकल्प
ताज्या बातम्या