नाणेनिधीकडूनही विकासदर अंदाजात कपात

नवी दिल्ली :करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या थैमानातून भारतीय अर्थव्यवस्थेला चिरस्थायी स्वरूपाचे नुकसान पोहचले असण्याची शक्यता दिसून येते आणि निर्यात आघाडीवर कामगिरी सुधारूनच अर्थव्यवस्थेतील ही हानी भरून काढली जाईल, असे प्रतिपादन ‘मूडीज् अ‍ॅनालिटिक्स’ने सोमवारी केले.

विद्यमान तिमाहीतील आर्थिक कामगिरीवर करोनाची छाया स्पष्टपणे दिसून येते. तथापि, वर्षांच्या अखेरीस आर्थिक पुनर्उभारीची प्रक्रिया सुरू झालेली दिसेल, असे मूडीज् अ‍ॅनालिटिक्सने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या टिपणांत नमूद केले आहे. आशिया-प्रशांत क्षेत्रातील अर्थव्यवस्थांवरील करोना विषाणूच्या नवीन डेल्टा प्रकाराने साधलेल्या विपरीत परिणामांचा आढावा घेणाऱ्या या टिपणांत दुसऱ्या तिमाहीनंतर या क्षेत्रावरील मंदीचे ग्रहण दूर सरताना दिसून येईल, असा आशावादही व्यक्त केला आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेत निर्यातीचा तुलनेने छोटा वाटा असला तरी, वस्तूंच्या किमतीतील वाढीने निर्यातीचे मूल्यही वाढले आहे. पहिल्या लाटेच्या आघातातून भारताची अर्थव्यवस्थेला सावरण्यास हाच घटक कारणीभूत ठरला होता, असे या टिपणाने म्हटले आहे. दुसरी लाटही जी आता जवळपास ओसरत चालली आहे, तिच्या फटकाऱ्यातून अर्थव्यवस्थेच्या उभारीचा पाया हा निर्यातीतील वाढीनेच रचला जाईल, असे या टिपणाचे निरीक्षण आहे.

जीडीपी वाढीचा दर ९.५ टक्के राहण्याचा अंदाज

दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेतील सुधाराला खीळ बसण्याची शक्यता व्यक्त करतानाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून भारताचा चालू आर्थिक वर्षांचा विकास दरासंबंधी अंदाज खाली आणला आहे. देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी वाढीचा दर  मार्च २०२२ अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षांत ९.५ टक्के असेल, असे मंगळवारी तिने स्पष्ट केले. या जागतिक वित्तसंस्थेचा विद्यमान वित्त वर्षांसाठीचा यापूर्वीचा जीडीपी वाढीचा अंदाज १२.५ टक्के होता.