scorecardresearch

‘सेन्सेक्स’ ५७ हजारांखाली

जागतिक प्रतिकूलतेपायी भांडवली बाजारावर मंदीवाल्यांनी पकड अधिक घट्ट केली असून, बुधवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांकांना झड लागण्याचा क्रम कायम राहिल्याचे दिसून आले.

‘सेन्सेक्स’ ५७ हजारांखाली
प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : जागतिक प्रतिकूलतेपायी भांडवली बाजारावर मंदीवाल्यांनी पकड अधिक घट्ट केली असून, बुधवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांकांना झड लागण्याचा क्रम कायम राहिल्याचे दिसून आले. परकीय गुंतवणूकदारांची माघार आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यातील ऐतिहासिक नीचांकी घसरणीने बाजारातील नकारात्मक वातावरणात आणखी भर घातली.

मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या समभाग विक्रीने सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांमध्ये बुधवारी सलग सहाव्या सत्रात एक टक्क्यापर्यंत घसरण पाहावी लागली. रिझव्‍‌र्ह बँकेकडून अपेक्षित संभाव्य रेपोदरवाढ आणि वायदा बाजाराच्या करार समाप्तीमुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५०९.२४ अंशांनी घसरून ५६,५९८.२८ पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात त्याने ६२१.८५ अंश गमावत ५६,७८५.६७ अंशांचा तळ गाठला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १४८.८० अंशांची घसरण झाली आणि तो १६,८५८.६० पातळीवर स्थिरावला.

उदयोन्मुख देशांच्या भांडवली बाजारातून परदेशी गुंतवणूकदार काढता पाय घेत असून सुरक्षित गुंतवणुकीच्या स्थानाचा शोध घेत आहेत. जागतिक बाजारातील मंदीच्या संकेताचा देशांतर्गत भांडवली बाजारावर अजूनही मोठा परिणाम झालेला नाही. देशांतर्गत अर्थव्यवस्था मजबूत असली तरीही जगभरातील मंदीच्या वाढत्या चिंतेमुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले. मुंबई शेअर बाजाराकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारच्या सत्रात २,८२३.९६ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या