मुंबई : मध्यवर्ती बँकेकडून रेपो दरात पुन्हा करण्यात आलेली अर्ध्या टक्क्यांची वाढ ही एकंदर अपेक्षेनुरूप असल्याने भांडवली बाजारात विशेषत: बँकांच्या समभागांमध्ये खरेदीला बहर आला. त्या परिणामी सलग सात सत्रांत सुरू राहिलेल्या निर्देशांकांच्या घसरणीला शुक्रवारी लगाम बसला. सलग आठव्या महिन्यात महागाई दर रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहनशील पातळीच्या वर कायम असल्याने रिझव्‍‌र्ह बॅंकेने चालू आर्थिक वर्षांत एकंदर १.९० टक्क्यांची वाढ करत रेपोदर ५.९० टक्के असा तीन वर्षांतील कळसाला नेला आहे.

सप्ताहअखेरच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १०१६.९६ अंशांनी म्हणजेच १.८० टक्क्यांनी वाढून ५७,४२६.९२ पातळीवर बंद झाला. त्याने दिवसभरात १३१२.६७ अंश म्हणजेच २.३२ टक्क्यांची झेप घेत ५७,७२२.६३ या उच्चांकी पातळीलाही गाठले होते. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक २७६.२५ अंशांनी म्हणजेच १.६४ टक्क्यांनी वधारला आणि १७,०९४.३५ पातळीवर स्थिरावला. सरलेल्या सप्ताहात सेन्सेक्सने ६७२ अंश (१.१५ टक्के) तर निफ्टीने २३३ अंश (१.३४ टक्के) गमावले. रिझव्‍‌र्ह बँकेकडून अपेक्षेप्रमाणे झालेली रेपो दर वाढ आणि देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत मध्यवर्ती बँकेने दाखविलेल्या विश्वासाने तेजीवाल्यांना बळ मिळाले आणि सलग सात सत्रातील घसरण रोखली गेली.

रिझव्‍‌र्ह बँकेने विकास दराच्या अंदाजात केलेली किरकोळ घट आणि महागाई दरासंबंधीचे अनुमान कायम ठेवले आहे. जागतिक पातळीवरील भू-राजकीय स्थिती आणि इतर देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून होणाऱ्या आक्रमक व्याजदर वाढीबाबत गव्हर्नरांनी सावधगिरीचा इशारा देत येत्या काळात आणखी व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत. त्यांच्या समालोचनांत भांडवली बाजाराच्या दृष्टीने विपरीत काहीही नसल्याचे गुंतवणूकदारांकडून स्वागतच झाले, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, टायटन, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक आणि टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक तेजी दर्शवीत होते. दुसरीकडे डॉ. रेड्डीज, एशियन पेंट्स, आयटीसी आणि हिंदूस्थान युनिलिव्हर या कंपन्यांच्या समभागात घसरण झाली.बीएसईकडे उपलब्ध आकडेवारीनुसार परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारच्या सत्रात ३,५९९.४२ कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांकात शुक्रवारी अनुक्रमे १.४५ टक्के आणि १.३९ टक्के वाढ झाली. तर क्षेत्रीय पातळीवर दूरसंचार क्षेत्र ३.४९ टक्के, धातू २.६६ टक्के, वित्तीय सेवा २.३६ टक्के आणि गृह निर्माण क्षेत्र १.९४ टक्क्यांनी वधारले.

रुपयाला ३७ पैशांची भक्कमता

मुंबई : डॉलरच्या तुलनेत घसरणाऱ्या रुपयाने शुक्रवारच्या सत्रात झेप घेतली. डॉलरच्या तुलनेत ३७ पैशांनी भक्कम बनत स्थानिक चलन ८१.३६ पातळीपर्यंत बळावले. परकीय चलन मंचावर रुपयाने ८१.६० या पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली आणि नंतर ते ८१.१७ पर्यंत वधारले. तर सत्रात ८१.६९ रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती. गुरुवारच्या सत्रात देखील रुपया डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकीवरून २० पैशांनी वाढून ८१.७३ रुपयांवर स्थिरावला होता.