बाजारात सुरू असलेल्या निवडणूक-पूर्व तेजीत सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांनी नव्या उच्चांकांकडे कूच करीत अनुक्रमे २२ हजार आणि ६५०० या पातळ्यांना गवसणी घातली. पण हा उच्चांकी बहर काही मोजक्याच ‘अ’ वायदा गटाच्या समभागांपुरता मर्यादित असल्याचे गेल्या वेळच्या स्तंभात म्हटलेच आहे. अनेक सामान्य गुंतवणूकदारांना अशा समयी आपण बाजारात नाही याचे वैषम्य वाटत असेल.
गाडी चुकल्याची ही खंत मग आयत्या वेळी गुंतवणुकीसाठी कोणते शेअर्स निवडावेत अशा घिसाडघाईपर्यंत येते. अशी चूक आपला गुंतवणूकदार कायम करीत आला आहे आणि मग अंतिमत: शेअर बाजारालाच – ‘सट्टा बाजार’ वगैरे शेलकी दूषणे देऊन तो या गुंतवणूक पर्यायापासून कायमचा फारकत घेताना दिसला आहे. अशा समयी खरे तर गुंतवणुकीसाठी नवे शेअर्स शोधण्यापेक्षा, हाती असलेल्या शेअर्समधून नफा किती व कसा कमावता येईल, याचीच गुंतवणूकदाराने काळजी वाहायला हवी.
औद्योगिक उत्पादनवाढीचा निर्देशांकाने तीन महिन्यांच्या घसणीनंतर जानेवारीत दाखविलेली सकारात्मकता म्हणजे आपल्या उद्योगक्षेत्राचा गाडा रूळावर येत असल्याचे द्योतक म्हणता येईल. १५ मार्च ही अग्रिम कराचा भरणा करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा कोणत्या उद्योगक्षेत्रातील कुठल्या कंपनीने वार्षिक नफ्याच्या पूर्वानुमाने किती कराचा हप्ता भरला हे स्पष्ट होईल.
देशाच्या अर्थगतीचे चित्र स्पष्ट करणारा हा आणखी एक पूर्वसंकेत असेल. सद्य बाजार तेजी ही नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी पाहण्याच्या स्वप्नाचे दृश्यमान रूप असण्यापेक्षा, विदेशी वित्तसंस्थांना उदयोन्मुख बाजारांमध्ये आजच्या घडीला भारताव्यतिरिक्त अन्य कोणता पर्याय उरलेला नाही, हेच म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. चीनच्या अर्थस्थितीचे आकडे कमजोर आहेत, रशियाला युद्धज्वराने वेढले आहे, तर ब्राझील-इंडोनेशियापेक्षा भारताच्या आर्थिक वृद्धीची संभाव्यता अधिक सुस्पष्ट आहे, या विदेशी गुंतवणूकदारांची भारताबद्दलच्या आकर्षणाची कारणे आहेत. म्हणूनच दैनंदिन सरासरी १००० कोटी रुपयांच्या दराने हे फिरंगी गुंतवणूकदार आपल्या भांडवली बाजारात गेल्या काही दिवसात खरेदी करीत आली आहेत. विदेशात सुरू असलेल्या गुंतवणुकीने रुपयाचे मूल्य पुन्हा प्रति डॉलर ६० च्या घरात स्थिरावू पाहत आहे. चालू खात्यावर तूटही कल्पनातीत अशा सुधार पातळीवर आली आहे. परिणामी देशांतर्गत चलनफुगवटय़ाचा पर्यायाने महागाईचा दर लक्षणीय सपाटीला आला आहे.
आता या सर्वाच्या परिणामी रिझव्‍‌र्ह बँकेकडून येत्या १ एप्रिलला नियोजित पतधोरण कसे वळण घेईल, हा नजीकच्या काळातील औत्सुक्याचा मुद्दा असेल. बाजाराचे विचाराल तर व्याज दर कपात होईल, या अपेक्षेचे पारडे जड आहे. बँकांच्या समभागांमध्ये अलीकडच्या दिवसातील वाढते स्वारस्य याचे द्योतक आहे. ‘बँक निफ्टी’ निर्देशांकाने तीन महिन्यांच्या उच्चांक दाखविला आहे. विद्यमान तेजीची हीच काय ती एक जमेची बाजू ठरावी.
शिफारस: सध्या बाजाराला खालच्या बाजूने उताराची जोखीम फारशी नसली तरी या बाजारात अल्पकालीन हेतूने उडी घेणे धोक्याचेच! खरेदी करायचीच तर ती दोन-तीन वर्षांचा अवकाश जमेस धरून. अशा खरेदीदारांसाठी व्हर्लपुल ऑफ इंडिया आणि हॅवेल्स इंडिया हे उत्तम ठरावेत.