मुंबई : जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेत आणि त्या परिणामी देशांतर्गत पातळीवर निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या आयसीआयसीआय बँक आणि हिंदूस्तान युनिलिव्हर कंपन्यांच्या समभागात सर्वाधिक वाढ झाल्याने सोमवारी सप्ताहारंभी सेन्सेक्सने ३२७ अंशांची कमाई   केली.

दिवसअखेर सेन्सेक्स ३२६.८४ अंशांनी वधारून ५३,२३४.७७ पातळीवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये ८३.३० अंशांची वाढ झाली आणि १५,८३५.३५ पातळीवर स्थिरावला.

जागतिक बाजारातील तेजी देशांतर्गत भांडवली बाजारात प्रतििबबित झाली. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांचे समभाग वधारल्याने सकाळच्या सत्रात नकारात्मक पातळीवर व्यवहाराला सुरुवात करणाऱ्या भांडवली बाजाराची सांगता मात्र तेजीसह झाली. परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा सुरू असला तरी देशांतर्गत गुंतवणूकदारांनी कमी मूल्यांकनाला उपलब्ध असलेल्या चांगल्या कंपन्यांच्या समभागावर लक्ष केंद्रित केले आहे. आगामी काळात जाहीर होणाऱ्या कंपन्यांच्या तिमाही आर्थिक कामगिरीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे विनोद नायर यांनी नोंदवले.