मुंबई : गेले काही दिवस सुरू असलेल्या भांडवली बाजार निर्देशांकांतील तेजीच्या दौडीला सोमवारी जागतिक बाजारातील सकारात्मक कलाने मोठी झेप घेण्याचे बळ मिळवून दिले. परिणामी सप्ताहाची दमदार सुरुवात करताना, भांडवली बाजार निर्देशांकांनी चार महिन्यांतील उच्चांकपदाला गवसणी घातली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड जोडगोळीसह, निर्देशांकांत वजनदार स्थान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या समभागांमध्ये झालेल्या जोरदार खरेदीच्या बळावर, सेन्सेक्स ४६५.१४ अंश (०.८० टक्के) उसळून सोमवारच्या दिवसातील व्यवहार संपताना ५८,८५३.०७ पातळीवर स्थिरावला. चालू वर्षांतील ११ एप्रिल २०२२ नंतरचा हा सेन्सेक्सचा सर्वोच्च स्तर आहे. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक – निफ्टी १२७.६० अंशांनी (०.७३ टक्के) वाढला आणि दिवसाचे व्यवहार त्याने १७,५२५.१० या पातळीवर बंद केले.  

सेन्सेक्समधील मिहद्र अँड मिहद्र सर्वाधिक ३.१३ टक्क्यांनी वाढला. त्या खालोखाल बजाज फिनसव्‍‌र्ह, एनटीपीसी, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, लार्सन अँड टुब्रो, एचडीएफसी, डॉ रेड्डीज, इंडसइंड बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी मूल्यवाढ साधली. याउलट, जून तिमाहीत सात टक्क्यांच्या घसरणीसह ६,०६८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविणारी कामगिरी जाहीर करणारा स्टेट बँकेचा समभाग १.९५ टक्क्यांनी आपटला. अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडिया, विप्रो, पॉवरग्रिड आणि सन फार्मा हे सोमवारच्या व्यवहारातील इतर पिछाडीवर राहिलेले समभाग होते. दमदार वाढीसह खुल्या झालेल्या युरोपातील प्रमुख बाजारांचा कल पाहता स्थानिक बाजारातील उत्साह हा उत्तरार्धात सत्रअखेपर्यंत टिकून राहून उत्तरोत्तर दुणावतच गेला.

मधल्या काळात पाठ करून माघारी गेलेल्या विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सातत्यपूर्ण खरेदी आणि खनिज तेलाच्या घसरलेल्या आंतरराष्ट्रीय किमती हे सध्याच्या बाजारातील तेजीची प्रमुख कारणे आहेत. मुख्य निर्देशांकाने आज घेतलेल्या पाच शतकी झेपेत, अग्रणी समभागांमधील दमदार खरेदीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, तर स्टेट बँकेसह प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कमकुवत निकालांमुळे एकंदरीत बँकिंग समभागांच्या मूल्यावर दबाव राहिला, असे जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी मत नोंदविले. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.३१ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.२८ टक्क्यांनी वाढले.

खरेदी उत्साहाने तेजीला चालना

गेल्या काही महिन्यांपासून माघारी जात असलेल्या अथवा बाजारापासून अलिप्त राहिलेल्या विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी पुन्हा एकदा खरेदीत स्वारस्य दाखविण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे बाजार निर्देशांकांना मोठी चालना मिळाली आहे.

मोहरमनिमित्त सार्वजनिक सुटी असल्याने मंगळवारी भांडवली बाजारातील व्यवहार बंद राहतील.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex climbs 465 points nifty close above 17500 zws
First published on: 09-08-2022 at 05:36 IST