सेन्सेक्सची पंधरवडय़ाच्या तळाला लोळण

वस्तू व सेवा कर तसेच जमीन हस्तांतरण विधेयकाच्या रूपात आर्थिक सुधारणा रखडल्या असतानाच विरोधकांमुळे तयार झालेल्या संसदेचा आखाडय़ामुळे भांडवली बाजाराने बुधवारी व्यवहारातील मोठी निर्देशांक आपटी अनुभवली.

वस्तू व सेवा कर तसेच जमीन हस्तांतरण विधेयकाच्या रूपात आर्थिक सुधारणा रखडल्या असतानाच विरोधकांमुळे तयार झालेल्या संसदेचा आखाडय़ामुळे भांडवली बाजाराने बुधवारी व्यवहारातील मोठी निर्देशांक आपटी अनुभवली. डॉलरच्या तुलनेत सलग दुसऱ्या व्यवहारात चिनी युआनमधील मूल्य घसरणीही बाजाराची घसरण विस्तारली.
सलग चौथ्या व्यवहारात घसरताना सेन्सेक्समधील बुधवारचा उतार हा तब्बल ३५३.८३ अंशांचा राहिला. परिणामी २७,५१२.२६ हा पंधरवडय़ाचा नवा तळ मुंबई निर्देशांकाने स्थापित केला. ११२.९० अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ८,४००चा स्तर सोडत ८,३४९.४५ ची पातळी गाठली. प्रमुख निर्देशांक यापूर्वी २८ जुलै रोजी बुधवार समकक्ष स्तरावर होते.
आर्थिक सुधारणा तसेच चीनकडून सलग दुसऱ्या दिवशी युआनच्या केल्या गेलेल्या अवमूल्यनाची चिंताही बाजारात दिवसभर राहिली. त्यातच डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्यही व्यवहारात ६० नजीक आल्यानेही बाजार अस्वस्थ झाला. मात्र गुंतवणूकदारांनी आर्थिक सुधारणांना येत नसलेल्या वेगाला त्यापेक्षा अधिक गंभीर घेतले.
जुलैमधील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई व जूनमधील औद्योगिक उत्पादन दराच्या बुधवारी उशिरा जाहीर होणाऱ्या आकडेवारीची प्रतीक्षा करत गुंतवणूकदारांनी बाजारात दिवसभर विक्रीचा सपाटा लावला.
सेन्सेक्सने यापूर्वीच्या सलग तीन व्यवहारांत ४३२.०४ अंश घसरण नोंदविली आहे. तर बुधवारच्या मोठय़ा घसरणीने मुंबई निर्देशांक ७८५.८७ अंशांनी खाली आला आहे.
पोलाद, स्थावर मालमत्ता, तेल व वायू, बँक, वाहन, ऊर्जा, भांडवली वस्तू असे जवळपास साऱ्याच क्षेत्रांतील समभाग घसरले. वेदांता, हिंदाल्को, कोल इंडिया, स्टेट बँक टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटो, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, भेल, हिंदुस्थान युनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज अशा आघाडीच्या समभागांची विक्री झाली.
सेन्सेक्समधील ३० पैकी अवघ्या ७ समभागांचेच मूल्य वाढू शकले. ॅउलट भक्कम होत असलेल्या डॉलरमुळे इन्फोसिस, टीसीएस, विप्रोसारख्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे समभाग ३.४० टक्क्यांपर्यंत उंचावले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकही अनुक्रमे २.४९ व २.१३ टक्क्यांनी वाढले.
रुपयाची ‘मोदी’पूर्व पातळीवर घसरण, डॉलरच्या तुलनेत ६५ च्या वेशीवर!
मुंबई :डॉलरच्या तुलनेतील रुपयाचा प्रवास बुधवारी अधिक घसरणीकडे कायम राहिला. सलग सहाव्या सत्रात घसरण नोंदविता भारतीय चलन तब्बल ५९ पैशांनी आपटत ६४.७८ वर येऊन ठेपला. ६५ नजीकच्या स्थानिक चलनाचा हा गेल्या दोन वर्षांतील मूल्य तळ आहे.
डॉलरच्या तुलनेत चीनने स्वत:चे युआन हे चलन तब्बल ३.५ टक्क्य़ांनी खाली आणल्याची चर्चा समस्त जागतिक – आर्थिक व्यासपीठावर रंगली असतानाच अमेरिकी चलनापुढे भारतीय रुपयानेही बुधवारी मोठी नांगी टाकली.
मंगळवारच्या सत्रा दरम्यान ४० पैशांची घसरण राखताना ६४ च्या खालचा प्रवास नोंदविणाऱ्या रुपयाने बुधवारच्या सत्राची सुरुवात ६४.५५ या घसरत्या पातळीवरून केली. व्यवहारात रुपया गेल्या २३ महिन्यांच्या तळात आला. यावेळी ६४.९४ पर्यंत घसरणाऱ्या रुपयाने सप्टेंबर २०१३ नंतरची किमान पातळी गाठली.
सत्रा दरम्यान ६४.५५ पर्यंतच झेप घेऊ शकणाऱ्या रुपयाने बुधवारच्या मोठय़ा आपटीसह गेल्या सहा व्यवहारातील तब्बल १०४ पैशांची (१.६३ टक्के) घसरण नोंदविली आहे. युआन सलग दुसऱ्या दिवशी खाली आले असताना रुपयातील एकाच व्यवहारातील आपटी एक टक्क्य़ाची होती, असे वेरासिटी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमित ब्रह्मभट्ट यांनी म्हटले आहे.
जानेवारीपासून रुपया डॉलरच्या तुलनेत २ टक्क्य़ांनी घसरला आहे. चीनच्या युआनचे मूल्य घसरत असताना त्याचा मोठा परिणाम भारतीय चलनावरही होऊ लागला आहे. जपान (येन) व युरोपीयन युनियन (युरो) नंतर चलन अवमूल्यन करणारी चीन ही तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sensex closes 354 points down at