गुंतवणूकदारांना पाच दिवसांत १९.५० लाख कोटींचा फटका

मुंबई : जागतिक भांडवली बाजारात घबराटीने सुरू असलेल्या विक्रीचे अनुकरण करीत, स्थानिक बाजारात गुंतवणूकदारांनी मागील दोन महिन्यांत एकाच सत्रात झालेली सर्वात मोठय़ा घसरणीचा दणका सोमवारी अनुभवला. ऐन अर्थसंकल्पाच्या तोंडावर झालेल्या या भयानक पडझडीने काही दिवसांपूर्वीपर्यंत अत्युच्च शिखराच्या दिशेने सुरू असलेल्या सेन्सेक्स-निफ्टीच्या आगेकूच आणि हर्षोल्हासाला घोर निराशेत बदलून टाकले. जानेवारीतील उच्चांकी शिखरांपासून, दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी अवघ्या काही दिवसांत ७ टक्क्यांहून अधिक मोठी घसरण अनुभवली आहे.

देशातील भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांना काळा दिवस ठरावा अशा भयानक पडझडीचा सोमवारी अनुभव दिला. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक असलेला सेन्सेक्स १,५४६ अंशांनी गडगडून ५८,०००च्या पातळीखाली गेला. दिवसअखेर हा निर्देशांक ५७,४९१.५१ वर, तर निफ्टी निर्देशांक ४६८.०५ अंशांनी गडगडून १७,१४८.१० या पातळीवर बंद झाला. दोन्ही निर्देशांक प्रत्येकी २.६६ टक्क्यांनी आपटले. गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला सेन्सेक्स आणि निफ्टी इतक्या मोठय़ा फरकाने आपटताना दिसले होते. .

सलग पाच सत्रांत सुरू राहिलेल्या या तीव्र स्वरूपाच्या पडझडीत सेन्सेक्सने ३,८१७ अंशांचा फटका बसला असून, गुंतवणूकदारांना सुमारे १९.५० लाख कोटी रुपये मातीमोल झाल्याचे पाहावे लागले आहे.

अर्थसंकल्प-पूर्वगुंतवणूकदारांचा सावध पवित्रा आणि अस्मानाला पोहोचलेल्या महागाईवर नियंत्रणासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हकडून उद्यापासून सुरू होणाऱ्या बैठकीतील अपेक्षित व्याजदर वाढीच्या निर्णयाचे परिणाम याबद्दलच्या साशंकतेची एकत्रित परिणती म्हणून ही मोठी पडझड दिसून आली. सोमवारी सकाळच्या सत्राची सेन्सेक्समध्ये २५० अंशांच्या घसरणीनेच सुरुवात झाली. दुपारच्या सत्रात ही घसरण अधिकच वाढत गेली. दुपारनंतर खुल्या झालेल्या युरोपीय बाजारातील नकारात्मक कल पाहता, विक्रीला जोर चढत गेला आणि पडझडीची व्याप्तीही वाढली. 

बाजारात घबराटीने सुरू झालेल्या विक्रीने दोन दिवसांपूर्वी विक्रमी तिमाही नफा कमावणारी कामगिरी करणारा रिलायन्स इंडस्ट्रीज (४ टक्के घसरण) आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागांनाही घसरणीचा फटका बसला. तर बाजारात नव्याने पदार्पण करणाऱ्या नव्या पिढीच्या तंत्रज्ञानाधारित नवउद्यमी कंपन्यांसाठी तर ही बाब आणखीच मारक ठरली. पेटीएमचे समभाग मूल्य प्रारंभिक विक्री किमतीच्या निम्म्यावर आले आहे, तर झोमॅटो, नायका, पॉलिसी बझार, कारट्रेड टेक या अन्य कंपन्यांनाही १० टक्के ते २० टक्क्यांची घसरगुंडी या दिवसाने दाखविली.

जागतिक पातळीवरील महागाईचा भडका आणि अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हकडून अपेक्षेपेक्षा लवकर व्याज दरवाढ केली जाण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले. त्याचेच भयावह पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटत  आहेत. जोखमीबाबत सजग बनलेले गुंतवणूकदार आठवडय़ाभरावर आलेल्या अर्थसंकल्पाकडेही साशंकतेने पाहत सावध बनलेले दिसतात.

– विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस

बेहाल ‘आयपीओ’बहाद्दर!

सोमवारी मुंबई शेअर बाजारातील पडझड (टक्के)

झोमॅटो ९१.४०  v १९.६५

नायका (एफएसएन)      १,७३४.८५३ v १२.९३

पीबी फिनटेक    ७६८.६० v १०.०८

कारट्रेड टेक     ७६८.२५ v ५.४७ 

पेटीएम (वन 97)      ९१७.३५ v ४.४६ 

फिनो पेमेंट्स बँक       ३८०.०५ v ३.१०