तीन दिवसांवर आलेल्या मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाबाबत व्यावहारिक अपेक्षा बाळगत गेल्या काही दिवसांपासून तेजीसह सज्ज झालेल्या सेन्सेक्सने सोमवारी सप्ताहारंभीच २६ हजारांच्या जादुई आकडय़ाला गाठले. तर निफ्टीने ७,८०० वेशीपर्यंत चाल करणारा सर्वोच्च स्तर गाठला. व्यवहारात २५,१२३.५५ पर्यंत झेप घेणारा मुंबई निर्देशांक दिवसअखेर १३८.०२ अंश वाढीसह २६ हजारांपल्याड २६,१००.०८ वर थांबला. तर निफ्टी सत्रअखेर ३५.५५ अंशांनी वाढून  ७,७८७.१५ वर स्थिरावला.
नरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प गुरुवारी सकाळी ११ वाजता जाहीर होत आहे. विकासाला चालना देण्याबरोबरच महागाई नियंत्रणासाठी उपाययोजना सुचविणे अभिप्रेत असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या या अर्थसंकल्पासाठी भांडवली बाजार गेल्या अनेक दिवसांपासूनच उत्साहित आहे. असे करताना सेन्सेक्स शुक्रवारअखेर २६ हजारांनजीक पोहोचला होता.
सोमवारी मात्र बाजाराची तेजीसह सुरुवात करताना सेन्सेक्स पहिल्या ४० मिनिटांतच २६ हजारांवर धडकला. या वेळी तो २६,११५ वर होता. यानंतर बाजारात विक्रीचा काहीसा दबाव निर्माण झाल्याने निर्देशांक दुपारच्या व्यवहारात पुन्हा २६ हजारांच्या खाली, २५,९९३ पर्यंत घसरला. मात्र अखेरच्या क्षणी त्याने पुन्हा २६ हजारांवरील झेप घेतली. २६,११९ पर्यंत तो गेला. सत्रातील त्याचा हा उच्चांक होता. तर बंदअखेरही त्याने सर्वोच्च टप्प्याचीच नोंद केली.
बाजाराला कंपन्यांच्या तिमाही नफ्याच्या आशादायक वाढीचीही जोड मिळाली. चालू आठवडय़ात केंद्रीय अर्थसंकल्प येत असतानाच चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्षही सुरू होत आहेत. याची सुरुवात अर्थातच माहिती तंत्रज्ञानातील इन्फोसिसने होईल.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी शुक्रवारी ७,७५८ वर होता. सोमवारी त्यानेही सत्रात ७,७९२ पर्यंत झेप नोंदविल्यानंतर दिवसअखेर ७,७८७.१५ हा सर्वोच्च टप्पा पार केला. दोन्ही प्रमुख निर्देशांक आता त्यांच्या ऐतिहासिक उच्चांकावर विराजमान झाले आहेत.
मुंबई शेअर बाजारात २.६३ अंश वाढीसह माहिती तंत्रज्ञान निर्देशांकच आघाडीवर राहिला. इन्फोसिस, टीसीएस, विप्रोचे समभाग ३.२३ टक्क्यांसह उंचावले. १.१२ टक्के वाढीच्या ऊर्जा क्षेत्राचीही बाजारात भर पडली. मंगळवारी जाहीर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पाच्या पाश्र्वभूमीवर या क्षेत्राशी निगडित कंपनी समभागांनीही जोरदार हालचाल सप्ताहारंभी नोंदविली. सेन्सेक्समधील २१ समभाग वधारले.

रुपयाची तीन आठवडय़ांतील सर्वात मोठी आपटी
मुंबई : तब्बल तीन आठवडय़ांतील सर्वात मोठी आपटी खात रुपया सप्ताहारंभीच ६० च्या तळात येऊन विसावला. डॉलरच्या तुलनेत स्थानिकच चलन सोमवारच्या एकाच व्यवहारात तब्बल २९ पैशांनी आपटले. परिणामी रुपया ६०.०१ पर्यंत घसरला. भांडवली बाजाराची वाटचाल ऐतिहासिक टप्प्याला पोहोचली असतानाच परकी चलन व्यवहारात मोठी हालचाल नोंदली गेली.
रुपया यापूर्वी १८ जून रोजी ३६ पैशांनी घसरला होता. नव्या आठवडय़ाची सुरुवात ५९.८० या किमान स्तरावर करणारा रुपया व्यवहारात सत्रात ६०.०४ पर्यंत घसरला. त्याची दिवसाची सुरुवात हाच व्यवहारातील सर्वोच्च स्तर ठरला. रुपयाची ५९.७२ ने गेल्या आठवडय़ाची अखेर झाली होती.
सावरत असलेल्या अमेरिकी अर्थव्यवस्थेमुळे अमेरिकन चलनाला विशेषत: बँकांकडून मागणी येत असल्यामुळे भारतीय चलनातील कमकुवता दिसून येत असल्याचे निरिक्षण कोटक सिक्युरिटीजचे चलन विश्लेषक अनिंद्य बॅनर्जी यांनी नोंदविले आहे.
अन्य प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत मात्र डॉलर निर्देशांक ०.०३ टक्क्यांनी घसरला आहे. चलन व्यवहारातील सहभागींसह सर्वाच्याच नजरा आता भारतीय अर्थसंकल्पाकडे आहेत, तेव्हा चलनाचा आगामी प्रवास उत्सुकतेचा राहू शकतो, असे मत इंडिया फॉरेक्स अ‍ॅडव्हायजर्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गोयंका यांनी व्यक्त केले आहे.
आयटी समभागांना मागणी
* चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाही निकालांच्या हंगामाची सुरुवात नेहमीप्रमाणे इन्फोसिसने होऊ घातली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या दुसऱ्याच दिवशी भांडवली बाजारावर विपरीत परिणाम करणाऱ्या कंपनीच्या निकालांची घोषणा होत आहे.
या पाश्र्वभूमीवर सोमवारी मुंबई शेअर बाजारात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी उल्लेखनीय वाढ नोंदविली. या कंपन्यांचे समभाग सप्ताहारंभी ३.२ टक्क्यांपर्यंत उंचावले होते.
* इन्फोसिस    :        रु. ३,३४३.७५    (+३.२३%)
* टीसीएस    :           रु. २,४८३.५०    (+३.०६)
* हेक्झावेअर     :      रु. १५८.५०     (+२.०६%)
* विप्रो    :                रु. ५५७.७०     (+१.८६%)
* एचसीएल टेक    :  रु. १,५०८.००     (+१.८५%)
रेल्वे समभागही उंचावले
* मोदी सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प मंगळवारी जाहीर होत आहे. प्रत्यक्षात भाडेवाढ यापूर्वीच लागू झाली असली तरी नव्या गाडय़ा, नवे मार्ग व माल वाहतूक, खासगीकरण यांची प्रतीक्षा या अर्थसंकल्पात राहणार आहे.
याबाबतच्या घोषणेवर प्रतिक्रिया देणाऱ्या कंपन्यांचे समभाग सोमवारी वधारले. मुंबई शेअर बाजारातील रेल्वेशी संबंधित सेवा, उपक्रमातीलकंपन्यांच्या समभागांची झेप १३ टक्क्यांपर्यंतची होती.
*  टेक्समॅको रेल अँड इंजिनीअरिंग    :    रु. १४५.७०      (+१३.०३%)
*  तितागड व्हॅगन्स    :                           रु. ३३०.५५     (+४.९९%)
*  कालिंदी रेल निर्माण    :                      रु. १३५.३५      (+४.९६)
*  केर्नेक्स मायक्रोसिस्टिम्स    :              रु. ७३.९०        (+४.३८%)