मुंबई : देशांतर्गत पातळीवर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण असल्याचे आकडेवारीवरून प्रथमदर्शनी निदर्शनास येत असले तरी जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांमुळे, भांडवली बाजारात शुक्रवारी सप्ताहाअखेर निर्देशांकांतील किरकोळ घसरणीने झाली. तरी सेन्सेक्स-निफ्टी हे प्रमुख निर्देशांकांनी सलग चौथ्या सप्ताहात तेजीमय आगेकूच आणि अनुक्रमे ६१,००० व १८,२०० चे टप्पेही कायम राखले. २४ सप्टेंबर २०२१ रोजी संपलेल्या आठवडय़ानंतर, निर्देशांकांनी नोंदविलेली साप्ताहिक वाढीची ही अलीकडची सर्वात मोठी मालिका आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स शुक्रवारच्या व्यवहारात १२.२७ अंशांच्या किरकोळ घसरणीसह ६१,२२३.०३ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्येही नगण्य २.०५ अंशांची घसरण झाली आणि तो १८,२५५.७५ पातळीवर दिवसअखेर स्थिरावला. साप्ताहिक आधारावर, सेन्सेक्समध्ये १,४७८.३८ अंशांची म्हणजेच २.४७ टक्क्यांची, तर निफ्टीने सरलेल्या आठवडय़ात ४४३.०५ अंशांची कमाई केली असून, तो २.४८ टक्क्यांनी वधारला आहे. जागतिक बाजारपेठेतील अस्वस्थतेमुळे देशांतंर्गत पातळीवर भांडवली बाजाराची कमकुवत सुरुवात झाली. मात्र माहिती तंत्रज्ञान, गृह निर्माण आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या खरेदीमुळे भांडवली बाजाराला अधिक घसरण होण्यापासून तारले. अमेरिकी मध्यवर्ती बँकेकडून मार्चपासून व्याजदर वाढीच्या सूचक वक्तव्याने जागतिक पातळीवर भांडवली बाजारांमध्ये समभाग विक्रीला चालना मिळाली. अमेरिकेत गेल्या ४० वर्षांतील सर्वाधिक महागाई दर नोंदला गेल्याने जागतिक स्तरावर महागाईची चिंता वाढली आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex down 12 points closes on 61223 nifty ends at 18255 zws
First published on: 15-01-2022 at 02:27 IST