‘सेन्सेक्स’मध्ये त्रिशतकी आपटी

भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांची चिंता वाढल्याचे शुक्रवारी अधिक स्वरूपात स्पष्ट झाले.

सेन्सेक्स

महागाई दरात वाढीबाबत चिंतेचे पडसाद
भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांची चिंता वाढल्याचे शुक्रवारी अधिक स्वरूपात स्पष्ट झाले. वाढत्या महागाईमुळे रिझव्र्ह बँक दर कपात करण्यास उत्सुक नसणार असे मानत तसेच पी-नोट्सवरील सेबीच्या अधिकच्या र्निबधानंतर सप्ताहअखेर बाजारात विक्री दबाव निर्माण झाला.
३००.६५ अंश घसरणीसह सेन्सेक्सने शुक्रवारी २५,५०० चा स्तर सोडत २४,४८९.५७ वर विराम घेतला, तर ८५.५० अंश नुकसानाच्या रूपात निफ्टी आठवडाअखेर ७,९०० चा स्तर सोडत ७,८१४.९० वर थांबला. दोन्ही निर्देशांकांत गुरुवारच्या तुलनेत एक टक्क्याहून अधिक घट झाली.
साप्ताहिक तुलनेत मात्र सेन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे २६१.०७ व ८१.४५ अंशांनी वाढले आहेत. सेन्सेक्सचा यापूर्वीचा २५,५०० खालील तळ हा ६ मे रोजी २५,४००.२७ असा होता, तर निफ्टीचा शुक्रवारचा प्रवास ७,७८४.२० ते ७,८८१ दरम्यान राहिला.
एप्रिलमधील किरकोळ महागाई दराने ५ टक्क्य़ांपुढील नोंदविलेला प्रवास व मार्चमध्ये जवळपास शून्यावर आलेल्या औद्योगिक उत्पादन दरामुळे बाजारात सप्ताहअखेरच्या दिवशीही निरुत्साह होता. विशेषत: रिझव्र्ह बँक आता व्याजदर कपात करण्याची शक्यता धूसर असल्याने भांडवली बाजारातील बँक समभागांची जोरदार विक्री झाली. स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक यांचे समभाग मूल्य २ टक्क्य़ांपर्यंत घसरले.
रिझव्र्ह बँकेचे आगामी पतधोरण येत्या जूनमध्येच आहे. पी-नोट्सवरील र्निबध भांडवली बाजार नियामक यंत्रणा सेबीने अधिक विस्तारल्याने बाजारातील विदेशी निधी ओघ आणखी आटण्याची शक्यता बाजारात व्यक्त केली गेली.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता, पोलाद, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन, तेल व वायू आदींमध्ये घसरण नोंदली गेली, तर अदानी पोर्ट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर यांना मोठय़ा घसरणीला सामोरे जावे लागले.
सेन्सेक्समध्ये घसरलेल्या समभागांमध्ये भेल, एचडीएफसी, टाटा स्टील, लार्सन अॅन्ड टी, गेल, भारती एअरटेल, ल्युपिन, हिरो मोटोकॉर्प, टीसीएस, महिंद्र अॅन्ड महिंद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी, बजाज ऑटो, सन फार्मा आदी तब्बल २७ समभागांचा समावेश राहिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sensex down 300 points

Next Story
ओंकार स्पेशिअ‍ॅलिटीचा चिपळूणमध्ये नवा प्रकल्प
ताज्या बातम्या