नफेखोरीने चार सत्रांतील बाजार-तेजीला खंड !

गेल्या सलग चार व्यवहारांतील तेजी अखेर गुंतवणूकदारांच्या नफेखोरीमुळे बुधवारी रोखली गेली.

सेन्सेक्स

गेल्या सलग चार व्यवहारांतील तेजी अखेर गुंतवणूकदारांच्या नफेखोरीमुळे बुधवारी रोखली गेली. ५१.५६ अंश घसरणीमुळे सेन्सेक्स २६,११७.८५ पर्यंत येताना त्याच्या गेल्या तीन आठवडय़ांच्या वरच्या टप्प्यापासून ढळला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत २३.५५ अंश घसरण होऊन प्रमुख निर्देशांक ७,९३१ वर स्थिरावला.
बँकांसाठी आठवडाभरात नवीन ऋण पद्धती सादर करण्याच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या संकेताने बँक समभागांच्या मूल्य हालचालीवर गुंतवणूकदारांच्या चिंतेची मोहोर उठली. मंगळवारच्या पतधोरणाच्या दिवशी संमिश्र मूल्य नोंद झालेले बँकांचे समभाग बुधवारी मात्र घसरले.
डॉलरच्या तुलनेत घसरलेल्या रुपयाचे तसेच नोव्हेंबरमधील वाहन कंपन्यांची अपेक्षित विक्री वाढ न झाल्याचा परिणामही बाजारावर बुधवारी उमटला. सोबतच अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदर वाढीची धास्तीही बाजाराने घेतली.
सुरुवातीच्या तेजीच्या व्यवहारामुळे मुंबई निर्देशांक सत्रात २६,२५६.४२ पर्यंत झेपावला, तर निफ्टीनेही व्यवहारात ७,९७९.३० हा सर्वोच्च टप्पा गाठला. दिवसअखेर दोन्ही प्रमुख निर्देशांक ०.३० टक्क्यांपर्यंत घसरले.
गेल्या चार व्यवहारांतील सेन्सेक्समधील वाढ ३९३.६६ अंश राहिली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्थिर व्याजदराच्या पतधोरणानंतरही बाजाराने मंगळवारी किरकोळ वाढ राखली होती. बुधवारी मात्र बाजाराला हा क्रम राखता आला नाही.
बँक क्षेत्रातील स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक यांचे समभाग मूल्य १.८३ टक्क्यांपर्यंत घसरले. सेन्सेक्समधील अन्य घसरणाऱ्या समभागांमध्ये भेल, इन्फोसिस, टाटा मोटर्स, कोल इंडिया, हिंदुस्थान यूनिलिव्हर, एल अ‍ॅण्ड टी यांचा क्रम राहिला. सेन्सेक्समधील १४ समभाग घसरले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sensex down by 51