मुंबई : जागतिक बाजारातील मंदीसदृश परिस्थिती आणि त्या परिणामी परदेशी गुंतवणूकदारांकडून पैसा पुन्हा माघारी नेण्यास सुरुवात झाल्याने मंगळवारी सलग तिसऱ्या सत्रात भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकात घसरण झाली. सेन्सेक्स ८४४ अंशांनी आपटला, तर निफ्टी पुन्हा १७,००० अंशांखाली घरंगळला आहे. मंगळवारच्या सत्रात दिवसअखेर सेन्सेक्स ८४३.८९ अंशांच्या म्हणजेच १.४६ टक्क्यांच्या घसरणीसह ५७,१४७.३२ पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये ९४०.७१ अंशांची पडझड होत सत्रात त्याने ५७,०५०.४० अंशांच्या दिवसभरातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २५७.५४ अंशांची घसरण झाली आणि तो १६,९८३.५५ पातळीवर स्थिरावला.

वाढत्या भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांना जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याची भीती सतावते आहे. परिणामी गुंतवणूकदार जागतिक मंदीच्या धसक्याने सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून विकसनशील बाजारपेठांमधून निधी काढून घेत आहेत. आगामी काही दिवसांमध्ये महागाईची आकडेवारी प्रसिद्ध होणार असून, तीदेखील चिंतेत भर घालणारीच असेल. मात्र माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टीसीएसने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत उत्साहजनक निकाल जाहीर केल्याने महागाईच्या चिंतेने ग्रासलेल्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

जागतिक पातळीवर इतर देशांच्या भांडवली बाजारांच्या तुलनेत, देशांतर्गत विक्री फारशी आक्रमक नाही. कारण परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा मारा केला तरी दुसरीकडे स्वस्त झालेल्या मूल्यांकनाचा फायदा घेत देशांतर्गत गुंतवणूकदार समभाग खरेदीला प्राधान्य देत आहेत, असेही नायर म्हणाले. सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया, टाटा स्टील, टेक महिंद्रा, इन्फोसिस, डॉ. रेड्डीज, टायटन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या समभागात गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केला.