मुंबई : सलग चार सत्रांमध्ये अत्युच्च शिखर गाठणारी धाव सुरू राहिल्यानंतर, बुधवारच्या व्यवहारांतही सुरुवातीलाच ५६ हजारांच्या अभूतपूर्व पातळीपुढे कूच करणाऱ्या ‘सेन्सेक्स’च्या मुसंडीला गुंतवणूकदारांनी अनुसरलेल्या नफावसुलीने ग्रहण लावले.

बँकांच्या समभागांमध्ये दणक्यात सुरू झालेल्या विक्रीच्या परिणामी, सेन्सेक्सने मंगळवारच्या तुलनेत १६२.७८ अंशांच्या घसरणीसह दिवसअखेर ५५.६२९.४९ या पातळीवर विश्राम घेतला. दिवसाच्या व्यवहारात त्याने आजवरच्या अत्युच्च अशा ५६,११८.५७ अंशांच्या शिखरापर्यंत मजल मारली होती. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकांचीही सलग सात दिवस सुरू राहिलेली आगेकूच बुधवारी खंडित झाली. ४५.७५ अंशांच्या नुकसानीसह हा निर्देशांक दिवसाचे व्यवहार थंडावले तेव्हा १६,५६८,८५ असा बंद नोंदविला. या निर्देशांकाने बुधवारच्या सत्रात १६,७०१.८५ असा ऐतिहासिक अत्युच्च स्तर गाठला होता.

आघाडीच्या समभागांमध्ये, कोटक बँकेला सर्वाधिक नुकसान सोसावे लागले. आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रीड, इंडसइंड बँक, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस बँक आणि मारुतीचा समभागही गडगडला.