scorecardresearch

‘सेन्सेक्स’मध्ये ३६ अंश घसरण ; अमेरिकी महागाई दराबाबत सावधगिरी

बुधवारी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी हे सोमवारच्या तुलनेत नाममात्र फरकाने स्थिरावताना दिसले.

‘सेन्सेक्स’मध्ये ३६ अंश घसरण ; अमेरिकी महागाई दराबाबत सावधगिरी
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : जुलै महिन्यांतील अमेरिकेतील ग्राहक किमतींवर आधारित महागाई दराच्या जाहीर होऊ घातलेल्या आकडेवारीसंबंधी जगभरातील भांडवली बाजारातील सावधगिरीचे प्रतििबब म्हणून स्थानिक बाजारातील व्यवहारांमध्ये अस्वस्थता दिसून आली. बरोबरीने सलगपणे सुरू असलेल्या तेजी दौड पाहता, माहिती-तंत्रज्ञान व बांधकाम क्षेत्रातील समभागांमध्ये नफावसुलीने बुधवारी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी हे सोमवारच्या तुलनेत नाममात्र फरकाने स्थिरावताना दिसले.

कमकुवत जागतिक संकेत पाहता, गुंतवणूकदारांनीही मोठय़ा व्यवहारांपासून अंतर राखल्याने बुधवारच्या सत्रातील बहुतांश हिश्शात बाजार ठरावीक पातळीत हलता दिसून आला. दिवसअखेरीस सेन्सेक्स ३५.७८ अंश (०.०६ टक्के) अशा माफक घसरणीसह ५८,८१७.२९ या पातळीवर स्थिरावला. सेन्सेक्समधील ३० पैकी १३ समभागांनी मूल्यवाढ साधली, तर १७ समभाग घसरणीत राहिले. त्या उलट निफ्टीने सोमवारच्या तुलनेत ९.६५ अंशांची (०.०६ टक्के) नाममात्र वाढ साधली आणि १७,५३४.७५ या पातळीवर दिवसाला निरोप दिला. मंगळवारी मोहरमनिमित्त सार्वजनिक सुट्टीमुळे बाजारातील व्यवहार बंद होते.

अमेरिकेतील व्याजदरासंबंधाने तेथील मध्यवर्ती बँक- फेडच्या आगामी धोरणाचा कल निर्धारित करणारी तेथील चलनवाढीची आकडेवारी (भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री) जाहीर होणार असल्याने बुधवारच्या संपूर्ण व्यवहारात गुंतवणूकदार सावध स्थितीत दिसून आले. जुलैमधील चलनवाढीची ही आकडेवारी जूनच्या अनुषंगाने उच्च राहण्याचा अंदाज आहे. रोजगारवाढीची आकडेवारी आश्वासक असली, तरी उच्च चलनवाढीला लगाम घालण्यासाठी ‘फेड’ला कठोर दृष्टिकोन ठेवणे भाग पडेल, असे मत जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले. सावध पवित्र्यामुळे अल्प व्यवहार, तर दुसरीकडे नफावसुलीचे चित्रही बाजारात होते. त्या परिणामी व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये अनुक्रमे ०.१३ टक्के आणि ०.१० टक्के अशी दिवसाअंती घसरणीचे प्रमाण राहिले. आशियाई देशांमध्ये अन्यत्र, शांघाय, हाँगकाँग, टोक्यो, सोल हे प्रमुख बाजार बुधवारी मोठय़ा घसरणीसह बंद झाले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sensex ends 35 points down nifty closes at 17534 zws

ताज्या बातम्या