मुंबई : जागतिक पातळीवरील महागाईचा भडका आणि अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हकडून अपेक्षेपेक्षा लवकर व्याज दरवाढ केली जाण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले. त्याचेच पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटत बुधवारी मंदीवाल्यांनी बाजाराचा ताबा घेतला आणि सलग दुसऱ्या दिवशी प्रमुख निर्देशांकांमध्ये टक्क्यांहून मोठी घसरण झाली.

दिवसअखेर सेन्सेक्स ६५६.०४ अंशांच्या घसरणीसह ६०,०९८.८२ पातळीवर बंद झाला, तर निफ्टीमध्ये १७४.६५ अंशांची घसरण झाली. हा निर्देशांक दिवसअखेर १७,९३८.४० पातळीवर स्थिरावला. जागतिक अर्थव्यवस्थेतील चिंताजनक खुणांचे नकारात्मक पडसाद आणि माहिती-तंत्रज्ञान, बँकिंग आणि गृहोपयोगी वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात विक्रीचा सपाटा यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ६५६ अंशांची घसरण झाली. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्सने १,२१० अंश गमावले आहेत, तर निफ्टी ३७० अंश माघारी फिरला आहे.

जागतिक पातळीवर वाढता भू-राजकीय तणाव आणि खनिज तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये हताशा वाढली आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सातत्याने देशांतर्गत बाजारात समभाग विक्रीचा मारा सुरू असल्याने मंदीवाल्यांनी बाजाराचा ताबा घेतला आहे. इंग्लंडमधील महागाईचा दर नोव्हेंबरमधील ५.१ टक्क्यांवरून वाढून डिसेंबरमध्ये ५.४ टक्के असा तीन दशकांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. वस्तू आणि सेवांना वाढती मागणी, वाढता ऊर्जा खर्च आणि पुरवठय़ातील अडथळय़ांमुळे महागाईवाढीस अधिक चालना मिळाली आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख  विनोद नायर यांनी नोंदले.

जगातील प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकी डॉलर कमकुवत झाला, तर खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती (ब्रेन्ट क्रूड) गत साडेसात वर्षांत पहिल्यांदाच ८८.३३ डॉलर प्रति िपप अशा उच्चांकपदाला गेल्याचे बुधवारच्या व्यवहारात दिसून आले. तथापि भारतीय चलन रुपयाने मात्र तीन दिवसांच्या घसरणीपासून फारकत घेत, डॉलरच्या तुलनेत १४ पैशांनी मजबुती मिळवत ७४.४४ पातळीवर पोहोचला. मंगळवारच्या सत्रात रुपयाचे मूल्य ३३ पैशांनी गडगडले होते.

गुंतवणूकदारांच्या मत्तेत ५.२४ लाख कोटींचा ऱ्हास

सलग दोन दिवस झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत सुमारे ५.२४ लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजारातील सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवलाचे मूल्य हे सोमवारच्या सत्रातील २,८०,०२,४३७ कोटी रुपयांवरून कमी होत, बुधवारच्या व्यवहाराअंती २,७४,७७,७९० कोटी रुपयांवर रोडावले आहे. मंगळवारच्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १,२५४.९५ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.

आयटीला फटका

माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. त्यामध्ये इन्फोसिसच्या समभागाने २.८५ टक्क्यांच्या घसरणीसह निराशाजनक कामगिरी केली. त्यापाठोपाठ टीसीएस (१.८७ टक्के), विप्रो (१.५२ टक्के) आणि एचसीएल टेकचे (१.७० टक्के) समभाग घसरले.