दूरसंचार कंपन्यांना दणक्याचे भांडवली बाजारात पडसाद

मुंबई निर्देशांकाने गुरुवारप्रमाणेच शुक्रवारीही व्यवहारात ४२ हजाराचा विक्रमी टप्पा गाठला.

मुंबई : थकीत रक्कम आठवडाभरात चुकती करण्यास दूरसंचार कंपन्यांना  फर्मावणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची चिंता भांडवली बाजारात सप्ताहअखेरच्या व्यवहारात उमटलेली दिसून आली. परिणामी व्यवहारात ४२ हजाराला स्पर्श करणारा मुंबई निर्देशांक सत्रअखेर त्यापासून मागे फिरत किरकोळ वाढीसह, तर निफ्टीत नाममात्र वाढ झाली.

दूरसंचार कंपन्यांना आठवडय़ात १.४७ लाख कोटी भरण्याचे आदेश देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या निर्णयाचे अपेक्षित पडसाद भांडवली बाजारात उमटले. परिणामी व्होडाफोन आयडियासारख्या कंपनीचे समभाग तर एकाच व्यवहारात तब्बल २५.२१ टक्क्यांसह आपटले. भारती एअरटेल मात्र ५.५० टक्क्यांपर्यंत वाढला.

भांडवली बाजारात शुक्रवारी संमिश्र व्यवहार झाले. सेन्सेक्स अवघ्या १२.८१ अंश वाढीसह ४१,९४५.३७ वर स्थिरावला. मात्र निफ्टीत ३.१५ अंश घसरण होऊन राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक १२,३५२.३५ पर्यंत खाली आला. मुंबई निर्देशांकाने गुरुवारप्रमाणेच शुक्रवारीही व्यवहारात ४२ हजाराचा विक्रमी टप्पा गाठला. मात्र दूरसंचार क्षेत्रातील चिंतेने गुंतवणूकदारांनी विक्री धोरण अनुसरून किरकोळ निर्देशांक वाढ नोंदवूनही सेन्सेक्सला सर्वोच्च टप्पा गाठण्यास अडथळा आणला.

दोन वेळा विक्रमी स्तर गाठण्याची नोंद करणाऱ्या सप्ताहात सेन्सेक्स ३४५.६५ अंशांनी वाढला आहे. तर या दरम्यान निफ्टीतील भर ९५.५५ अंश राहिली आहे.

आठवडय़ाच्या शेवटच्या सत्रातील अस्थिरतेच्या वातावरणात व्यवहारअखेर तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर करणारा रिलायन्स इंडस्ट्रिजचे समभागमूल्य वाढले. भारती एअरटेलबरोबरच रिलायन्स जिओचा नोव्हेंबरमध्ये बाजारहिस्सा वाढण्याच्या घटनेचे भारती एअरटेल व रिलायन्सच्या वाढत्या मूल्यावर पडसाद उमटले.

त्याचबरोबर सन फार्मा, एचसीएल टेक, मारुती सुझुकीही वाढले. तर टीसीएस, एचडीएफसी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, स्टेट बँक आदी सेन्सेक्समध्ये घसरणीच्या यादीत राहिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sensex ends flat bharti airtel ril lead gains zws