मुंबई : स्थानिक भांडवली बाजाराने मंगळवारच्या अत्यंत अस्थिर व्यवहारसत्राची अखेर प्रमुख निर्देशांकांतील घसरणीसह केली. बाजारातील व्यवहार संपण्याला तासभर राहिला असताना, ग्राहकोपयोगी वस्तू, बँकिंग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये नफावसुलीसाठी विक्रीचा मारा सुरू झाला आणि सेन्सेक्स १०० अंशांनी घसरून ५१,१३४ वर बंद झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारनंतर खुल्या झालेल्या युरोपीय भांडवली बाजारांची कमकुवत सुरुवात पाहून देशांतर्गत भांडवली बाजाराला उतरती कळा लागली. दिवसअखेर भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने हेलकावे खात नकारात्मक पातळीत प्रवेश केला. दिवसअखेर सेन्सेक्स १००.४२ अंशांच्या घसरणीसह ५३,१३४.३५ पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने ६३१.१६ अंशांची झेप घेत ५३,८६५.९३ अंशांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. म्हणजे दिवसांतील  उच्चांकावरून तब्बल ७३२ अंश खाली त्याची बंद पातळी राहिली. तर निफ्टीमध्ये २४.५० अंशांची घसरणी झाली आणि तो १५,८१०.८५ पातळीवर स्थिरावला.

जागतिक मंदी आणि अनियंत्रित महागाई आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून व्याजदर वाढीचे आक्रमक धोरण अनुसरले जात असल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी झाला आहे.

तसेच जागतिक पातळीवर अजूनही अनिश्चिततेचे वातावरण कायम असल्याचे सध्याचा कल सूचित करतो आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयातील कामगिरी कमकुवत राहिली असून, प्रबळ डॉलरने जगभरातील उदयोन्मुख देशांच्या चलनांच्या मूल्यांनाही झाकोळले आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex falls 100 points nifty ends below 15850 zws
First published on: 06-07-2022 at 01:41 IST