मुंबई : जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतामुळे देशांतर्गत भांडवली बाजारात घसरण कायम असून मंगळवारी सलग तिसऱ्या सत्रात मंदीवाल्यांनी पकड अधिक घट्ट केली आहे.
दिवसअखेर सेन्सेक्समध्ये १०५.८२ अंशांची घसरण होत, तो ५४,३६४.८५ पातळीवर बंद झाला. मंगळवारी दिवसभरातील सत्रात बाजारात मोठय़ा प्रमाणावर अस्थिरता राहिली. सेन्सेक्सने दिवसभरातील सत्रात ५४,८५७.०२ अंशांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. मात्र अखेरच्या तासात नफावसुली झाल्याने भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी नकारात्मक पातळीत प्रवेश केला. तर निफ्टीमध्ये ६१.८० अंशांची घसरण झाली आणि तो १६,२४०.०५ पातळीवर स्थिरावला.
अमेरिकी भांडवली बाजार सोमवारच्या सत्रात मोठी घसरण होत तो वर्षभरातील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. याशिवाय अमेरिकी फेडरल रिझव्र्ह आणि देशांतर्गत पातळीवर रिझव्र्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्याने त्याचे भांडवली बाजारावर प्रतिकूल पडसाद उमटले आहे. जागतिक पातळीवर प्रमुख देशांच्या भांडवली बाजारांमध्ये झालेल्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा कायम ठेवला आहे. वाढती महागाई, उच्च व्याजदर आणि चीनमधील वाढत्या करोना संसर्गामुळे जागतिक मंदीच्या दिशेने वाटचाल होण्याच्या भीतीने आशियातील भांडवली बाजारांमध्ये निराशेचे वातावरण आहे, असे हेम सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख मोहित निगम यांनी सांगितले.