scorecardresearch

सेन्सेक्समध्ये १,४९१ अंश घसरण; निफ्टी १६ हजार अंशांच्या खाली

सोमवारी सेन्सेक्सने १,४९१ अंश गमावले तर निफ्टी १६,००० अंशांच्या महत्त्वपूर्ण पातळी खाली आला.

रशिया-युक्रेन संघर्षांच्या दरम्यान खनिज तेलाच्या किमती २००८ मधील उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. रविवारी ब्रेंट क्रूडचा दर १० टक्क्यांनी वधारत पिंपामागे १४० डॉलरनजीक पोहोचला होता. परिणामी घसरता विकासदर आणि महागाईचा भडका उडण्याच्या शक्यतेने सोमवारी भांडवली बाजारात मोठी घसरण झाली.

सोमवारी सेन्सेक्सने १,४९१ अंश गमावले तर निफ्टी १६,००० अंशांच्या महत्त्वपूर्ण पातळी खाली आला. याचबरोबर भांडवली बाजारातील घसरण आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा मारा केल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयात मोठी घसरण झाली.

सलग चौथ्या सत्रात घसरणीचा कल कायम असून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सची सकाळच्या सत्रात कमकुवत सुरुवात झाली. दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्स १,९६६.७१ अंश म्हणजेच ३.६१ टक्क्यांनी घसरून ५२,३६७.१० अंशांचा तळ गाठला. दिवसअखेर तो १,४९१.०६ अंशांच्या घसरणीसह ५२,८४२.७५ पातळीवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३८२.२० अंशांची घसरण होत तो  १५,८६३.१५ पातळीवर बंद झाला. दोन्ही प्रमुख निर्देशांक सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. गेल्या चार सत्रात सेन्सेक्सने ३,४०४.५३ अंश गमावले आहेत.

जुलै २००८ नंतर प्रथमच खनिज तेलाच्या किमती १३० डॉलर प्रतििपपाच्या वर पोहोचल्या आहेत. रशियाच्या तेल निर्यातीवर अमेरिका आणि युरोपीय देशांकडून बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. एकटय़ा रशियाचा जागतिक खनिज तेल पुरवठय़ात १० टक्के वाटा आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारात सोमवारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा सपाटा लावला. सोने, अ‍ॅल्युमिनिअम, तांबे इत्यादीसारख्या इतर वस्तूंवरही महागाईचा दबाव दिसून येत आहे. ज्यामुळे येत्या तिमाहीत कंपन्यांच्या नफ्यात  घट होण्याची शक्यता आहे, असे मत जियोजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँक, अ‍ॅक्सिस बँक, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, बजाज फिनसव्‍‌र्ह, अल्ट्राटेक सिमेंट आणि मिहद्र अ‍ॅण्ड मिहद्रचे समभाग प्रत्येकी ७.६३ टक्क्यांपर्यंत घसरले. तर सोमवारच्या सत्रात फक्त भारती एअरटेल, एचसीएल टेक्नॉलॉजी, टाटा स्टील आणि इन्फोसिस या चार कंपन्यांचे समभाग तेजी दर्शवीत होते.

रुपया ऐतिहासिक तळाला

मुंबई : रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेचे सावट चलन बाजारातही पडले. सोमवारी रुपयाने इतिहासात प्रथमच डॉलरमागे ७७ ची वेस ओलांडून सार्वकालिक नीचांक नोंदविला. भू-राजकीय तणाव आणि अस्थिरतेच्या पाश्र्वभूमीवर, सुरक्षित आश्रय म्हणून डॉलरमध्ये गुंतवणूक रूपांतरित करण्याचा जगभरात कल सुरू आहे. सोमवारच्या व्यवहारात या परिणामी रुपयाचे विनिमय मूल्य डॉलरच्या तुलनेत तब्बल ८४ पैशांनी गडगडले आणि ते ७७ च्या पातळीपुढे ७७.०१ या ऐतिहासिक नीचांकावर विसावले.

ब्रेंट क्रूड १२५ डॉलरपुढे

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण कायम आहे. अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांकडून रशियावर आर्थिक निर्बंध लादल्यानंतर आता तेल निर्यातीवर मर्यादा आणली जाण्याची शक्यता असल्याने सोमवारच्या सत्रात खनिज तेलाचे दर प्रतििपपामागे १० डॉलरने वधारल्या. भारताकडून होणारी तेल आयात ज्या आंतरराष्ट्रीय दराला आधार मानून होते, त्या ब्रेंट क्रूड तेलाच्या दराने सोमवारी िपपामागे १२ टक्क्यांची वाढ होत १२५ डॉलरची पातळी ओलांडली आहे. मागील १३ वर्षांतील हा उच्चांकी दर असून याआधी जुलै २००८ मध्ये ब्रेंट क्रूडचा भाव १३० डॉलर इतका होता.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sensex falls 1491 points nifty ends below 16000 zws

ताज्या बातम्या