मुंबई : निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात घसरण झाल्याने बुधवारी प्रमुख निर्देशांकांना सलग चौथ्या दिवशी घसरणीचा फटका बसला. खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे देशांतर्गत भांडवली बाजारावर मंदीची छाया पसरली आहे. 

सत्रारंभ चांगली मुसंडी घेत करणाऱ्या ‘सेन्सेक्स’ला हा सकारात्मक कल कायम राखता आला नाही. परिणामी दिवसअखेर २७६.४६ अंशांच्या घसरणीसह सेन्सेक्स ५४,०८८.३९ पातळीवर बंद झाला. दिवसभरातील व्यवहारात बाजारातील विक्रीचा जोर वाढत गेल्याने सेन्सेक्स ८४५.५५ अंश गमावत ५३,५१९.३० अंशांच्या नीचांकी पातळीपर्यंत गडगडला होता. बरोबरीने निफ्टीमध्ये ७२.९५ अंशांची घसरण झाली आणि तो १६,१६७.१० पातळीवर दिवसअखेर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये लार्सन अँड टुब्रो, बजाज फिनसव्‍‌र्ह, एनटीपीसी, बजाज फायनान्स, मारुती, पॉवर ग्रिड, इन्फोसिस आणि आयटीसीच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली.

महागाई दराच्या टक्क्यावर लक्ष

अमेरिकेची एप्रिल महिन्यातील महागाई दराची आकडेवारी, त्यापाठोपाठ देशांतर्गत ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दराचा टक्काही गुरुवारी प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे. या दोन्ही आकडेवारी चिंता वाढविणाऱ्या असतील या कयासामुळे बाजार अस्थिर झाला आहे. अमेरिकेतील महागाई दराचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. भारतात मात्र महागाई दर चढाच राहण्याची अपेक्षा आहे. जागतिक स्तरावर सर्वच भांडवली बाजाराच्या दृष्टीने महागाई दर हा आजच्या घडीला सर्वात लक्षणीय घटक बनला आहे. फेडरल रिझव्‍‌र्हकडून करण्यात आलेल्या दरवाढीमुळे महागाई किती आटोक्यात येईल, यावरून बाजाराची पुढील दिशा ठरेल, असे मत जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

रुपया सावरला

मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत घसरत जात ऐतिहासिक नीचांकापर्यंत गडगडलेला रुपयाचे विनिमय मूल्य बुधवारी मात्र १० पैशांनी सावरताना दिसले. मुख्यत: खनिज तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे मंगळवार आणि पाठोपाठ बुधवारच्या सत्रात रुपया २० पैशांनी सावरून ७७.२४ रुपये प्रति डॉलर पातळीवर स्थिरावला. देश-विदेशातील प्रतिकूल घटनांच्या एकत्रित परिणामाने सोमवारी मोठय़ा घसरगुंडीसह रुपयाने प्रथमच ७७.५०ची ऐतिहासिक नीचांकाची नोंद केली होती. त्यानंतर, रुपयाच्या मूल्यातील घसरण सावरण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकही सक्रिय झाल्याचे आणि चलन बाजारात तिचा हस्तक्षेप वाढल्याचे सूत्रांकडून समजते. तथापि देशांतर्गत भांडवली बाजारातील घसरण आणि परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या निधीच्या निर्गमनामुळे बुधवारी रुपयाच्या मूल्यातील वाढ मर्यादित राहिली.