मुंबई : महागाईचे चिंताजनक रूप आणि कमालीच्या मंदावलेल्या औद्योगिक उत्पादनाने देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे उभ्या केलेल्या दुहेरी आव्हानाच्या पार्श्वभूमीवर, गुंतवणूकदारांनी बँकिंग, वित्त आणि भांडवली वस्तू कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर विक्रीचा मारा गुरुवारी केला. परिणामी बुधवारच्या सत्रात अनुभवल्या गेलेल्या तेजीचा ताबा पुन्हा मंदीवाल्यांनी सक्रियता दाखवत मिळविल्याचे प्रत्यंतर निर्देशांक घसरणीत उमटले. 

रुपयातील घसरण आणि वाढत्या खनिज तेलाच्या किमतीने बाजारातील वातावरण अधिक गहिरे बनविले. एकंदर निराशामय राहिलेल्या गुरुवारच्या सत्रात दिवसअखेर  सेन्सेक्स ३९०.५८ अंशांनी घसरून ५७,२३५.३३ पातळीवर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीमध्ये १०९.२५ अंशांची घसरण झाली आणि तो १७,०१४.३५ पातळीवर स्थिरावला.

किरकोळ महागाई दर मर्यादेपेक्षा अधिक चढा राहिल्याने ते भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचे एक प्रमुख कारण बनले आहे. याचबरोबर ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादनात घटल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अमेरिकेतील महागाईमुळे जागतिक बाजारपेठेत पुन्हा अस्थिरता निर्माण होऊ शकते.