scorecardresearch

‘सेन्सेक्स’मध्ये ७६९ अंश घसरण

तेलाच्या वाढत्या किमती आणि पुरवठा साखळीतील अनिश्चिततेमुळे नजीकच्या काळात महागाई मोठय़ा प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेत आणि रशिया-युक्रेनमधील तणावात दिवसेंदिवस अधिकच भर पडत असल्याने जगभरातील भांडवली बाजारांनी धसका घेतला आहे. परिणामी शुक्रवारी सलग तिसऱ्या सत्रात प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण कायम राहिली.

सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने १,२१४.९६ अंशांच्या घसरणीसह ५३,८८७.७२ अंशांचा तळ गाठला होता. मात्र उत्तरार्धात तो सावरत, दिवसअखेर ७६८.८७ अंशांच्या घसरणीसह ५४,३३३.८१ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २५२.७० अंशांची घसरण झाली आणि तो १६,२४५.३५ अंशांवर दिवस सरताना स्थिरावला.

युक्रेनमध्ये असलेल्या युरोपातील सर्वात मोठय़ा अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाने हल्ला केल्यामुळे तणावात आणखी वाढ झाली आहे. परिणामी गुंतवणूकदारांनी जागतिक पातळीवरील प्रमुख भांडवली बाजारांमध्ये समभाग विक्रीचा मारा सुरू केला. तेलाच्या वाढत्या किमती आणि पुरवठा साखळीतील अनिश्चिततेमुळे नजीकच्या काळात महागाई मोठय़ा प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. भारतातही महागाई दराने रिझव्‍‌र्ह बँकेने निश्चित केलेली केलेली सहनशीलता पातळी ओलांडण्याची भीती निर्माण झाली आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

५.५९ लाख कोटींची मत्ता लयाला!

देशांतर्गत बाजारात सलग तीन सत्रांत झालेल्या समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे गुंतवणूकदारांनी ५.५९ लाख कोटी रुपयांची मत्ता गमावली आहे. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात तीन सत्रांत ५,५९,६२३.७१ कोटींची घसरण होत ते आता २,४६,७९,४२१.३८ कोटींवर पोहोचले आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sensex falls 769 points nifty settles below 16250 zws

ताज्या बातम्या