मुंबई : जागतिक बाजारातील प्रतिकूल संकेत आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये मंगळवारी २३६ अंशांची घसरण झाली. प्रमुख निर्देशांकांत चांगल्या वाढीसह सुरुवातीनंतर मंदीवाल्यांचा जोर वाढल्याने निर्देशांकांनी नकारात्मक पातळीत प्रवेश केला.

चढ-उतारांच्या हेलकाव्यांनंतर दिवसअखेरीस सेन्सेक्स २३६ अंशांच्या घसरणीसह ५४,०५२.६१ पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सने ५४,००० अंशांची पातळी मोडत ५३,८८६.२८ अंशांचा तळ गाठल्यानंतर काहीशी सुधारणा दर्शविली. तर निफ्टीमध्ये ८९.५५ अंशांची घसरण झाली आणि तो १६,१२५.१५ पातळीवर स्थिरावला.

मंद होत चाललेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या महागाईवर नियंत्रण राखण्यासाठी मध्यवर्ती बँकांकडून आक्रमकपणे वाढवण्यात येणारे व्याजदर यामुळे जागतिक पातळीवर गुंतवणूकदार चिंतित आहेत. ब्रिटन आणि युरोझोनमधील सेवा आणि उत्पादन क्षेत्राने गंभीर स्वरूपाच्या आकुंचनाच्या स्थितीचा प्रत्यय दिल्याचे मे महिन्यातील मासिक सर्वेक्षणात दिसून आले आहे. परिणामी जोखीम वाढल्याने गुंतवणूकदार सावध पवित्रा अवलंबीत आहेत. देशांतर्गत पातळीवर, बहुतांश क्षेत्रातील समभागात विक्रीचा मारा कायम आहे. मात्र नुकत्याच झालेल्या इंधनांवरील करकपातीने वाहननिर्मिती क्षेत्राला दिलासा मिळाला आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये, टेक महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचसीएल टेक्नॉलॉजीज, एशियन पेंट्स, एनटीपीसी, टाटा स्टील, इन्फोसिस, अ‍ॅक्सिस बँक आणि बजाज फिनसव्‍‌र्हच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर दुसरीकडे डॉ. रेड्डीज, एचडीएफसी, पॉवर ग्रिड, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक आणि नेस्लेचे समभाग तेजी व्यवहार करत स्थिरावले.