मुंबई : वाढत्या महागाईवर नियंत्रणासाठी रिझव्र्ह बँकेकडून तातडीची बैठक घेत, बुधवारी रेपो दरात ४० आधार बिंदूंच्या तडकाफडकी केलेल्या वाढीचे पाऊल भांडवली बाजाराच्या जिव्हारी लागला. रिझव्र्ह बँकेच्या घोषणेनंतर भांडवली बाजारातील प्रतिकूल पडसाद उमटत, सेन्सेक्स व निफ्टी हे प्रमुख निर्देशांक सव्वादोन टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,३०६.९६ अंशांच्या घसरणीसह ५५,६६९.०३ पातळीवर बंद झाला. गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीच्या माऱ्यापुढे सेन्सेक्सने दिवसभरातील सत्रात ५५,५०१.६० अंशांचा तळ गाठला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३९१.५० अंशांची घसरण झाली आणि तो १६,६७७.६० पातळीवर स्थिरावला.