मुंबई : जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि देशांतर्गत रिझव्‍‌र्ह बँकेकडून महागाई नियंत्रण अथवा आर्थिक विकास यापैकी कशाला प्राधान्य मिळेल, याबद्दलच्या उत्कंठेमुळे गुरुवारच्या सत्रात मंदीवाल्यांच्या प्रभावाखालील बाजारात प्रमुख निर्देशांक पुन्हा गडगडले. गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेत नफावसुलीला प्राधान्य दिल्याने सेन्सेक्समध्ये ५७५ अंशांची घसरण झाली. 

सलग तिसरे सत्र घसरणीचे राहिलेल्या गुरुवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ५७५.४६ अंशांच्या घसरणीसह ५९,०३४.९५ पातळीवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये १६८.१० अंशांची घसरण झाली आणि तो १७,६३९.५५ पातळीवर स्थिरावला. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या एचडीएफसी, टीसीएस, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांचे घसरणीत मोठा वाटा राहिला.

रिझव्‍‌र्ह बँकेची पतधोरण समिती शुक्रवारी द्विमाही पतधोरण जाहीर करणार असल्यामुळे भांडवली बाजारातील अस्थिरता वाढली आहे. क्षेत्रीय पातळीवर गेल्या काही सत्रांत वधारलेल्या धातू, ऊर्जा आणि तेल आणि वायू क्षेत्रातील समभाग तसेच व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागात सर्वाधिक नफावसुली झाली. रिझव्‍‌र्ह बँकेने भांडवली बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे व्याजदर जैसे थे ठेवल्यास बाजार सकारात्मक वातावरण राहील. मात्र खनिज तेलाच्या किमतीमुळे भांडवली बाजारापुढील आव्हान कायम आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये टायटन, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, विप्रो, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि पॉवर ग्रिडच्या समभागात घसरण झाली.