मुंबई : भांडवली बाजार निर्देशांकांनी सलग चौथ्या सत्रात अविरतपणे आगेकूच कायम ठेवत, गुरुवारी नवीन शिखराला गाठणारी कामगिरी केली. रिझव्‍‌र्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरणाच्या निर्णयापूर्वी माहिती-तंत्रज्ञान, दूरसंचार आणि ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांच्या खरेदीने बाजारातील तेजीचा उत्साह कायम राखला गेला.

सत्रात ५४,७१७.२४ या विक्रमी उच्चांकाला गाठल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने बुधवारच्या तुलनेत १२३.०७ अंशांची कमाई करीत ५४,४९२.८४ या बंद पातळीवर विश्राम घेतला. त्याचबरोबरीने निफ्टी निर्देशांकाने गुरुवारच्या व्यवहारात ३५.८० अंशांची ताजी भर घालत, १६,२९४.६० ही पातळी गाठली. दिवसाच्या व्यवहारात या निर्देशांकाने १६,३४९.४५ या अभूतपूर्व उच्चांकापर्यंत मजल मारली होती.

आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी व्होडाफोन-आयडियातून पदत्यागासह अंग काढून घेतल्याने, देशाचे दूरसंचार क्षेत्रात आता भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ या दोन स्पर्धकांतच विभागले जाईल, अशा चर्चाना सुरुवात झाली आहे. त्याचा परिपाक म्हणून गुरुवारच्या व्यवहारात भारती एअरटेलचा समभाग हा सेन्सेक्समधील सर्वाधिक ४.३० टक्क्यांची वाढ करणारा ठरला, तर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागानेही १.४१ टक्क्य़ाची दमदार वाढ साधली. आयटीसी, टेक महिंद्र, टाटा स्टील, एचसीएल टेक आणि एचडीएफसी हे अन्य वाढ नोंदविणारे समभाग ठरले.