मुंबई : बँकिंग, वित्त, ऊर्जा आणि वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांतील खरेदीने भांडवली बाजारातील सलग सहा सत्रांतील घसरणीला सोमवारी लगाम लागला. भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने १८० अंशांची कमाई करत सप्ताहाची सकारात्मक सुरुवात केली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १८०.२२ अंशांनी वधारून ५२,९७३.८४ पातळीवर बंद झाला. दिवसभरातील कामकाजात सेन्सेक्स ६३४.६६ अंशांनी वधारून ५३,४२८.२८ अंशांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये  ६०.१५ अंशांची भर पडली. तो १५,८४२.३० पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये एनटीपीसी, बजाज फायनान्स, मारुती, स्टेट बँक , एचडीएफसी, कोटक मिहद्र बँक, मिहद्र अँड मिहद्र, इंडसइंड बँक, लार्सन अँड टुब्रो, टायटन आणि एचडीएफसी बँकेचे समभाग सर्वाधिक वधारले आहेत. तर दुसरीकडे अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, आयटीसी आणि टीसीएसच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली.

सहा सत्रांत ५ टक्के घसरण

वाढती महागाई आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून गेल्या काही महिन्यांपासून समभाग विक्रीचा अविरत मारा सुरू असल्याने गेल्या सहा सत्रांतील घसरणीत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये पाच टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. अमेरिकी रोख्यांवर आकर्षक परतावा वाढल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा भारतीय भांडवली बाजाराकडे ओढा कमी झाला आहे. त्यांच्याकडून समभाग विक्रीचा मारा सुरू असताना, देशांतर्गत गुंतवणूकदार समभाग खरेदी करत असूनही बाजारातील घसरण रोखली गेलेली नाही.

 प्रतिकूल जागतिक संकेतांमुळे गेल्या सहा सत्रांत बाजारात मोठी घसरण झाली आहे, विशेषत: बाजारातील अखेरच्या काही तासांत समभाग विक्रीचा मारा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषत: परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार हे सध्या जोखीम कमी करू इच्छित असून, सुरक्षित गुंतवणूक साधनांच्या शोधात आहेत, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले आहे.