सप्ताहाच्या प्रारंभीच तेजी नोंदवत भांडवली बाजाराने महिन्याभराच्या उच्चांकस्तर सोमवारी पुन्हा गाठला. गेल्या सप्ताहअखेर उशिरा जाहीर झालेल्या  दुसऱ्या तिमाहीतील अपेक्षेपेक्षा चांगल्या आर्थिक विकासदराचे स्वागत करताना सेन्सेक्स १०६.०८ अंश वाढ नोंदवत २०,८९८.०१ वर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४१.७५ अंश वाढीसह ६२१७.८५ वर दिवसअखेर स्थिरावला.
चालू आर्थिक वर्षांतील जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीतील ४.८ टक्के या विकासदराच्या आकडय़ाची घोषणा शुक्रवारी भांडवली बाजारातील व्यवहार संपल्यानंतर झाली होती. त्यामुळे त्याचे सकारात्मक पडसाद मुंबई शेअर बाजारावर सोमवारी उमटणे साहजिकच होते. यानुसार सकाळच्या व्यवहारातच मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजार तेजीसह खुलले. सेन्सेक्स व्यवहारात २०,९४१ पर्यंत झेपावला. सरलेल्या ५ नोव्हेंबरला निर्देशांकाची ही सर्वोच्च पातळी होती. भांडवली वस्तू, आरोग्यनिगा, बँक, पोलाद क्षेत्रातील समभागांची बाजारात खरेदी दिसली. आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, एल अ‍ॅण्ड टी या समभागांनी सेन्सेक्सला २१ हजारानजीक पोहोचवले. सेन्सेक्समधील २१ कंपनी समभागांचे मूल्य उंचावले.
रुपया दोन आठवडय़ांच्या वरच्या टप्प्यावर
मुंबई: खुल्या बाजाराकडे वळलेल्या तेल कंपन्यांनी पुन्हा रिझव्‍‌र्ह बँकेने उपलब्ध करून दिलेल्या विदेशी चलन पर्यायाकडे वळणे सुरू केल्याने भारतीय रुपया उंचावताना दिसत आहे. चलन सोमवारी डॉलरच्या तुलनेत एकाच व्यवहारात तब्बल १३ पैशांनी उंचावल्याने त्याच्या ६२.३१ या टप्प्याला दोन आठवडय़ांचा उच्चांक प्राप्त झाला. नव्या आठवडय़ाची सुरुवात करतानाच रुपया ५२.३५ या वरच्या टप्प्यावर खुला झाला. व्यवहारात तो ६१.९६ पर्यंत झेपावला.