scorecardresearch

‘सेन्सेक्स’ची पाच शतकी उसळी; पुन्हा ५९ हजारांवर

अमेरिकेतील महागाई दरातील नरमाईने देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी बँकिंग, वित्त आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदीचा सपाटा लावल्याने सेन्सेक्सने गुरुवारी पाच शतकी उसळी घेतली.

‘सेन्सेक्स’ची पाच शतकी उसळी; पुन्हा ५९ हजारांवर
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अमेरिकेतील महागाई दरातील नरमाईने देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी बँकिंग, वित्त आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदीचा सपाटा लावल्याने सेन्सेक्सने गुरुवारी पाच शतकी उसळी घेतली. त्याच वेळी परदेशी गुंतवणूकदारांची साथ मिळाल्याने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने पुन्हा एकदा ५९,००० अंशांची पातळी सर केली.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५१५.३१ अंशांनी वधारून ५९,३३२.६० पातळीवर बंद झाला. त्याने गुरुवारच्या सत्रात ५९,४८४.९९ या दिवसभरातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. त्यापाठोपाठ राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेदेखील १२४.२५  अंशांची भर घातली आणि तो १७,६५९ पातळीवर स्थिरावला.

सरलेल्या जुलै महिन्यात अमेरिकेत महागाई दर अपेक्षेपेक्षा अधिक नरमल्याने त्याचे सकारात्मक पडसाद अमेरिकेसह जगभरातील भांडवली बाजारावर उमटले. परिणामी अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हकडून आगामी काळात व्याजदरासंबंधाने कमी आक्रमकता दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आशियासह युरोपातील बाजारांमध्येदेखील उत्साहाचे वातावरण होते. देशांतर्गत गुंतवणूकदार आता भारताच्या किरकोळ चलनवाढीच्या आकडेवारीकडे लक्ष ठेवून आहेत. भारतालाही चलनवाढीतून मासिक आधारावर किंचित दिलासा मिळण्याची आशा आहे, असे जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी बाजारातील उसळीसंबंधाने मत नोंदविले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.