मुंबई : सलग तीन तीन सत्रात झालेल्या घसरणीचा फायदा घेत गुंतवणूकदारांनी बुधवारच्या सत्रात ऊर्जा, बँकिंग, ग्राहकोपयोगी वस्तू आणि माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदीचा सपाटा लावला. त्या परिणामी बुधवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांकांनी १ टक्क्यांपर्यंत उसळी घेतली. जागतिक पातळीवर गुंतवणूकदार अमेरिकी मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझव्‍‌र्हचे पतधोरण आणि महागाई आकडेवारीच्या प्रतीक्षेत आहेत. त्याआधी अमेरिका आणि युरोपीय भांडवली बाजारांनी दाखवलेल्या तेजीचे पडसाद देशांतर्गत बाजारावर उमटले.

बुधवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्स ४७८.५९ अंशांनी (०.८४ टक्के) वधारून ५७,६२५.९१ पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सने ५४०.३२ अंशांची उसळी घेत ५७,६८७.६४ ही दिवसभरातील उच्चांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १४०.०५ अंशांची (०.८२ टक्के) वाढ साधली आणि त्याने पुन्हा १७,१००ची पातळी ओलांडली आणि १७,१२३.६० पातळीवर स्थिरावला.

जागतिक बाजारातील प्रतिकूल संकेतांकडे दुर्लक्ष करत देशांतर्गत बाजारात गुंतवणूकदारांनी कंपन्यांच्या तिमाही कामगिरीवर लक्ष केंद्रित केल्याने बाजारात पुन्हा चैतन्य निर्माण झाले. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएसने अपेक्षेपेक्षा चांगली आर्थिक कामगिरी करून यंदाच्या तिमाही हंगामाची जोरदार सुरुवात केली, त्यामुळे एकूणच क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे, असे निरीक्षण जियोजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये पॉवर ग्रिडचा समभाग सर्वाधिक ३.५ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ अ‍ॅक्सिस बँक २.८९ टक्के, एनटीपीसी २.४२ टक्के, इंडसइंड बँक १.९७ टक्के, लार्सन अँड टुब्रो १.७ टक्के आणि अल्ट्राटेक सिमेंट १.६५ टक्क्यांनी वधारला. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, कोटक बँक आणि आयटीसीच्या समभागांनी घेतलेल्या उसळीमुळे निर्देशांकांना बळ मिळाले. मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मंगळवारच्या सत्रात ४,६१२.६७ कोटी रुपये मूल्याची समभाग विक्री केली.

रुपया पुन्हा घसरला

रिझव्‍‌र्ह बँकेने परकीय चलन मंचावर केलेल्या हस्तक्षेपामुळे मंगळवारच्या सत्रात रुपयाने डॉलरच्या तुलनेत १९ पैशांची वाढ नोंदवत ८२.३२ रुपयांवर स्थिरावला होता. इतर चलनांच्या तुलनेत वधारलेला डॉलर आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ आटल्याने बुधवारच्या सत्रात रुपया पुन्हा १४ पैशांनी घसरून ८२.३५ वर स्थिरावला. परकीय चलन विनिमय मंचावर रुपयाने ८२.३२ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. दिवसभरातील सत्रात त्याने ८२.१५ रुपयांची उच्चांकी तर ८२.३७ रुपयांचा तळ पाहिला.