मुंबई : परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठय़ा अवधीनंतर प्रथमच समभाग विक्रीचा मारा थांबवून देशांतर्गत भांडवली बाजारात दाखवलेली सक्रियता आणि युरोपीय भांडवली बाजारातील सकारात्मक सुरुवातीपासून प्रेरणा घेत बुधवारच्या सत्रात स्थानिक बाजार प्रमुख निर्देशांकांत एक टक्क्याची तेजी दिसून आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांची ३० मेनंतर प्रथमच समभाग विक्रीच्या माऱ्यापेक्षा समभागांची खरेदी अधिक केली. मंगळवारच्या सत्रात (५ जुलै) परदेशी गुंतवणूकदारांनी १,२९५.८४ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले. बुधवारच्या सत्रात त्यांचा खरेदीवर भर दिसून आला.

बुधवारच्या सत्राअखेर सेन्सेक्स ६१६.६२ अंशांनी वधारून ५३,७५०.९७ पातळीवर स्थिरावला. दिवसभरातील सत्रात त्याने ६८४.९६ अंशांचा उच्चांक नोंदवत ५३,८१९.३१ ची पातळी गाठली होती. तर निफ्टीमध्ये १७८.९५ अंशांची भर पडली आणि तो १५,९८९.८० पातळीवर पोहोचला. दिवसभरातील सत्रात निफ्टीने १६,००० अंशाच्या महत्त्वपूर्ण पातळीपुढे मजल मारली होती.

जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देशांतर्गत भांडवली बाजारावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवत समभाग खरेदीला सुरुवात केली आहे. जागतिक मंदीच्या भीतीने तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. या घसरणीमुळे रसायने आणि वाहतूक क्षेत्रातील कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल वितरण कंपन्यांवरील खर्चाचा भार कमी होण्याची शक्यता आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये बजाज फिनसव्‍‌र्ह, बजाज फायनान्स, हिंदूस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, टायटन, मारुती सुझुकी, कोटक मिहद्र बँक आणि नेस्ले या कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी वाढ झाली. दुसरीकडे पॉवर ग्रिड, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो आणि टाटा स्टीलचे समभाग घसरणीसह बंद झाले.

तेलासह, कमॉडिटी बाजारात अस्थिरता

मुंबई : एकीकडे जागतिक आर्थिक मंदीची भीती आणि पुरवठय़ातील अडथळे यामुळे खनिज तेलासह, सर्वच प्रमुख जिनसांच्या किमतींमध्ये गेले दोन दिवस कमालीची अस्थिरता वाढली आहे. संभाव्य मंदीमुळे मागणी कमी होण्याच्या भीतीने तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती मंगळवारी १० टक्क्यांनी घसरल्या. अर्थव्यवस्थेत मंदी आल्यास या वर्षांच्या अखेरीस ब्रेंट तेल पिंपामागे ६५ डॉलपर्यंत घसरण्याची शक्यता सिटीग्रुप इन्कने वर्तविली आहे. जर आर्थिक मंदी सुरूच राहिली आणि तेलाची घसरण रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली गेली नाही तर २०२३ च्या अखेरीस किमती ४५ डॉलपर्यंत खाली येऊ शकतात, असेही सिटीने अहवालात म्हटले आहे. मंगळवारी सिटीचा अहवाल प्रसिद्ध होण्यापूर्वी तेलाची पिंपामागे ११२ डॉलरने विक्री सुरू होती. अहवाल प्रसिद्ध होताच काही क्षणात त्या १० डॉलरने गडगडल्या. बुधवारच्या व्यवहारात ब्रेंट तेलाच्या किमती अडीच टक्क्यांनी सावरल्या आणि पिंपामागे १०५ डॉलरवर त्याचे व्यवहार सुरू होते. तेलाबरोबरच, नैसर्गिक वायू, तांबे व अन्य धातू, तसेच गहू, मका, सोयाबीनसारख्या कृषी-उत्पादनांच्या किमतीतही मोठी घसरण दिसून आली.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex jumps 617 points nifty ends at 15990 zws
First published on: 07-07-2022 at 01:52 IST