मुंबई : जागतिक पातळीवर प्रमुख देशांच्या भांडवली बाजारांमधील उत्साही सुधारणा आणि देशांतर्गत पातळीवर निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात खरेदीच्या बहराने निर्देशांकांना बळ मिळाले. देशांतर्गत भांडवली बाजारात गेल्या दोन सत्रातील घसरणीनंतर मंगळवारच्या सत्रात भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने ७७७ अंशांची उसळी घेतली.

दिवसअखेर सेन्सेक्स ७७६.७२ अंशांच्या (१.३७ टक्के) वाढीसह ५७,३५६.६१ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ८६२.३५ अंशांची झेप घेत ५७,४४२.२४ अंशांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. तर निफ्टी२४६.८५ अंशांनी (१.४६ टक्के) वधारला. तो १७,२००.८० पातळीवर स्थिरावला.

जागतिक सकारात्मक संकेतांमुळे देशांतर्गत पातळीवर गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणावर समभाग खरेदीचा सपाटा लावला. मात्र चीन आणि रशियामध्ये करोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यामुळे सुरू झालेली टाळेबंदी, रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर वाढीच्या शक्यतेमुळे बाजारात अस्थिरता कायम आहे. मात्र बाजारातील प्रत्येक घसरणीत गुंतवणूकदारांकडून चांगल्या समभागांची खरेदी केली जात आहे.

गुंतवणूकदारांनी माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्मिती आणि अक्षय्य ऊर्जेशी संबंधित कंपन्या अशा वाढत्या महागाईचा आणि रोख्यांवरील वाढत्या व्याजदराचा परिणाम न होणाऱ्या कंपन्यांच्या समभागांच्या खरेदीला प्राधान्य द्यायला हवे, असा मोलाचा सल्ला जिओजित फायनान्शिअलचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी दिला.

सेन्सेक्समध्ये पॉवर ग्रिड, टायटन, मिहद्र अँड मिहद्र, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, स्टेट बँक, भारती एअरटेलच्या समभागात सर्वाधिक तेजी राहिली. दुसरीकडे अ‍ॅक्सिस बँक, एशियन पेंट्स, मारुती आणि टीसीएसच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली.

विदेशी गुंतवणूकदार रुष्टच!

विदेशी संस्थामक गुंतवणूकदारांकडून भांडवली बाजारात अव्याहतपणे समभाग विक्रीचा सपाटा सुरू होता. सोमवारच्या सत्रातही त्यांच्याकडून ३,३०२.८५ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री करण्यात आली.