मुंबई : जागतिक पातळीवरून महागाई आटोक्यात येत असल्याचे संकेत मिळत असल्याने देशांतर्गत पातळीवर गुंतवणूकदारांनी माहिती तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदीचा सपाटा लावला होता. त्या परिणामी सप्ताहाची दमदार सुरुवात होत सलग तिसऱ्या सत्रात भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेसने ४३३ अंशांची झेप घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी दिवसअखेर सेन्सेक्स ४३३.३० अंशांनी वधारून ५३,१६१.२८ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने  ७८१.५२ अंशांची उसळी घेत ५३,५०९.५० या दिवसभरातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. तर निफ्टीमध्ये १३२.८० अंशांची वाढ झाली आणि तो १५,८०० या महत्त्वपूर्ण पातळीच्यावर १५,८३२.०५ पातळीवर स्थिरावला.

केंद्र सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या उपाययोजनांमुळे वस्तू आणि सेवांच्या किमतीत होत असलेल्या घसरणीमुळे भांडवली बाजारात पुन्हा एकदा तेजीवाल्यांनी ताबा घेतला आहे. मात्र बाजारात सकारात्मकता असूनही, जागतिक मंदीची भीती, जगभरातील मध्यवर्ती बँकांचे आक्रमक दरवाढीचे धोरण आणि महागाई बाजारातील अस्थिरतेला चालना देऊ शकते.

ज्यावेळी अनिश्चिततेतून अर्थव्यवस्था स्थिर होण्याचे स्पष्ट संकेत आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार पुन्हा भांडवली बाजारात सक्रिय होऊन समभाग खरेदी करतील त्यावेळी बाजार पुन्हा तेजीच्या दिशेने झेप घेईल, असे मत जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये लार्सन अँड टुब्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, इन्फोसिस, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, भारती एअरटेल आणि टाटा स्टील यांच्या समभागात सर्वाधिक तेजी होती. दुसरीकडे कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टायटनच्या समभागात घसरण झाली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून भांडवली बाजारात अव्याहतपणे समभाग विक्रीचा मारा कायम असून शुक्रवारच्या सत्रात त्यांनी  २,३५३.७७ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

सरलेल्या आठवडय़ात ४ टक्क्यांची तेजी

सरलेल्या सप्ताहात २० जूनपासून भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने ४ टक्क्यांची तेजी दर्शविली आहे. एप्रिल २०२२ नंतरची ही सर्वात मोठी साप्ताहिक वाढ ठरली आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (एफआयआय)  होणाऱ्या विक्रीच्या माऱ्यामुळे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठलेल्या अनुक्रमे ६१,७६५ आणि १८,४७७ या उच्चांकी पातळीपासून सुमारे १५ टक्क्यांची घसरण झाली आहे. या दरम्यान एफआयआयकडून ऑक्टोबरपासून आतापर्यंत ३२ अब्ज डॉलर मूल्याचे समभाग विक्री करण्यात आले आहेत. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून या दरम्यान २.९३ लाख कोटींचे समभाग खरेदी करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex jumps energetic start week inflation hint investors ysh
First published on: 28-06-2022 at 00:02 IST