मुंबई : जागतिक पातळीवरील सकारात्मक आणि देशांतर्गत पातळीवर माहिती तंत्रज्ञान आणि वाहन निर्मिती क्षेत्रातील समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने शुक्रवारी सलग दुसऱ्या सत्रात भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी घोडदौड कायम राखली. जागतिक पातळीवर वाढती महागाई आणि प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून व्याजदर धोरण अधिक कठोर करण्याबद्दल चिंता असूनही जागतिक पातळीवरील भांडवली बाजारात आलेल्या खरेदीच्या लाटेचे पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटले. दिवसअखेर सेन्सेक्स ६३२.१३ अंशांनी वधारून ५४,८८४.६६ पातळीवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये १८२.३० अंशांची वाढ झाली आणि तो  १६,३५२.४५ पातळीवर स्थिरावला.

जगभरात सर्वच बाजारात समभाग खरेदीच्या लाटेमुळे देशांतर्गत पातळीवर किरकोळ गुंतवणूकदारही खरेदी-उत्सुक असल्याचे निदर्शनास येत आहे. याचबरोबर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा मारा कमी केल्यामुळे बाजारातील अस्थिरता कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या ६ ते ८ जूनदरम्यान होणाऱ्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात २५ ते ३५ आधार बिंदूंनी वाढ बाजाराने गृहीत धरली आहे. पतधोरण समितीच्या बैठकीतील निर्णय बाजाराची पुढील दिशा ठरविण्यात महत्त्वाचा घटक असेल.