मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात तेजीवाल्यांचा जोर कायम असून मंगळवारी सलग तिसऱ्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ नोंदवण्यात आली. तेल आणि वायू, बँकिंग आणि वाहन निर्मिती कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांच्या चौफेर खरेदीने ‘सेन्सेक्स’ने ३७९ अंशांच्या कमाईसह ६० हजार अंशांच्या दिशेने आगेकूच कायम राखली आहे.

घाऊक महागाई दराच्या जुलैमधील आकडेवारीतील उतार आणि एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक या अग्रणी समभागांना खरेदीचे पाठबळ मिळून झालेल्या मूल्यवृद्धीने निर्देशांकांना मंगळवारी चांगली झेप घेता आली. सेन्सेक्समध्ये ३७९.४३ अंशांची वाढ होत तो ५९,८४२.२१ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ४६०.२५ अंशांची भर घालत ५९,९२३.०३ पातळीला गवसणी घातली होती. दुसरीकडे निफ्टी निर्देशांकामध्ये १२७.१० अंशांची वाढ झाली आणि तो १७,८२५.२५ पातळीवर स्थिरावला. निफ्टीमधील  ५० कंपन्यांपैकी ४२ कंपन्यांचे समभाग वाढीसह बंद झाले.

घाऊक महागाईचा पारा कमी होत जुलैमध्ये तो पाच महिन्यांच्या नीचांकी १३.९३ टक्के नोंदविला गेला. अपेक्षेपेक्षा अधिक नरमलेला किरकोळ महागाई दर व अन्नधान्य, इंधनाच्या किमतीही कमी झाल्याने चलनवाढीचा ताण कमी होत आहे, तर अर्थव्यवस्थेत वाढीची लक्षणे बाजाराला सुखावणारी ठरली आहेत.