गुंतवणूकदारांना ८.४७ लाख कोटींचा फटका

सलग सात दिवस विक्रमी उच्चांक गाठणाऱ्या घोडदौडीनंतर, आता सलग तिसऱ्या दिवशी नफावसुलीमुळे बाजारातील घसरण वाढत गेली आहे.

सलग तिसऱ्या घसरणीत ‘सेन्सेक्स’चे ८४२ अंश नुकसान 

मुंबई : जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि सेन्सेक्समधील सर्वाधिक योगदान असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि टीसीएस या समभागांतील विक्रीने भांडवली बाजारात गुरुवारी प्रमुख निर्देशांक सलग तिसऱ्या सत्रात गडगडले. बाजाराचे वाढलेले मूल्यांकन आणि कंपन्यांच्या निराशाजनक तिमाही वित्तीय कामगिरीने गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली.

सलग सात दिवस विक्रमी उच्चांक गाठणाऱ्या घोडदौडीनंतर, आता सलग तिसऱ्या दिवशी नफावसुलीमुळे बाजारातील घसरण वाढत गेली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्स ३३६.६३ अंशाच्या घसरणीसह ६०,९२३.५० पातळीवर बंद झाला. मागील तीन दिवसात सेन्सेक्सने सुमारे ८४२ अंश गमावले आहेत. तर गुंतवणूकदारांची कमाईला ८,४७,३९७ कोटी रुपयांना कात्री लागली आहे.

गुरुवारच्या व्यवहारात राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक – निफ्टीमध्ये ८८.५ अंशाची घसरण झाली. तो दिवसअखेर १८,१७८.१० पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये एशियन पेंट्सच्या समभागाने ५ टक्क्यांच्या घसरणीसह निराशाजनक कामगिरी केली. त्यापाठोपाठ रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टाटा स्टील, टीसीएस आणि डॉ. रेड्डीजचे समभाग घसरणीसह बंद झाले. दुसरीकडे, कोटक बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि एनटीपीसीच्या समभागांची कामगिरी सरस ठरली. सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी २१ कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समध्ये क्षेत्रीय पातळीवर माहिती-तंत्रज्ञान, धातू, दूरसंचार,  ऊर्जा, गृहनिर्माण आणि प्राथमिक वस्तूंच्या निर्देशांकात २.३० टक्क्यांपर्यंत घसरण झाली. तर बँकेक्स, वित्त, वाहननिर्मिती निर्देशांक सकारात्मक राहिले.

आनंद राठीचे मुख्य समभाग संशोधक नरेंद्र सोळंकी म्हणाले, सकाळच्या सत्रात भांडवली बाजाराची सकारात्मक सुरुवात झाली. मात्र दुपारच्या सत्रात आशियाई बाजारातील घसरणीचा परिणाम झाल्याने बाजारात घसरण झाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sensex nifty index share market akp 94

Next Story
जैवतंत्रज्ञान पिकांच्या कृषी संशोधनावरील स्थगिती
ताज्या बातम्या